जागा आणि मनुष्यबळाअभावी पालिकेत कागदावरच राहिलेल्या ‘गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक’ (पीसीपीएनडीटी) कक्षाचे काम अखेर सुरू झाले आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १२ ऑगस्ट रोजी या कक्षासाठी खोली उपलब्ध झाली आहे, तसेच ४ एमबीबीएस डॉक्टर देखील कक्षाला मिळाले आहेत.
२०१२ मध्ये पीसीपीएनडीटी कक्षाचे विकेंद्रीकरण करण्याचे कारण देऊन विभागीय कार्यालयांकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर २२ कामांबरोबरच पीसीपीएनडीटी कक्षाचेही काम देण्यात आले होते. त्यानंतर गेली सलग दोन वर्षे पालिकेत पीसीपीएनडीटी कक्ष तयार करण्यासाठी अंदाजपत्रकात प्रत्येकी २० लाख रुपयांची तरतूद केली जात होती. परंतु दोन्ही वर्षे केवळ जागा उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे हा निधी वापरलाच गेला नव्हता. या आर्थिक वर्षांत पीसीपीएनडीटी कक्षासाठी ८ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मे २०१५ मध्ये हा कक्ष स्थापन करण्यासाठीच्या नवीन प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता मिळाली. या प्रस्तावानुसार या कक्षाला ३० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, परंतु इतके दिवस त्यातील १७ च कर्मचारी कक्षाकडे होते. कक्षाला जागा तर मिळाली नव्हतीच, पण सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करून तेथील कागदपत्रे तपासणे, सोनोग्राफी मशीन्सची नोंदणी, डॉक्टरांची कागदपत्रे तपासणे, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांचा आढावा घेणे, अशा कामांमधील तांत्रिक बाबी अधिक चांगल्या प्रकारे अवगत असणारे ४ पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी देखील कक्षाकडे नसल्यामुळे कक्षाचे काम थंडावले असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.
स्वतंत्र खोलीसह आता पीसीपीएनडीटी कक्षाला ४ पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळाले असून सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीदरम्यान गरज पडणाऱ्या ४ चारचाकी गाडय़ाही मिळाल्या आहेत. ‘मात्र अद्याप कक्षाला ५ संगणकांची आवश्यकता आहे, तसेच ३ कनिष्ठ लिपिक, ३ शिपाई आणि ३ डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचीही कक्षाला गरज आहे,’ असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.