23 September 2020

News Flash

स्वस्त धान्य दुकान महाग

पीओएस यंत्रामध्ये लाभार्थ्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेऊनच धान्य दिले जाते.

पीओएस यंत्रामध्ये लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट असेल, तरच दुकानदारांकडून धान्याचे वितरण करण्यात येते.

दुकानदारांची ओरड; धान्य न उचलणाऱ्यांवर कारवाई होणार

राज्य सरकारने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांत पीओएस (पॉइंट ऑफ सेल) यंत्र बसविण्याची सक्ती केली आहे. पीओएस यंत्रामध्ये लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट असेल, तरच दुकानदारांकडून धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार थांबला आहे. धान्याचा काळाबाजार करण्यास दुकानदारांना वाव मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकान चालवणे परवडत नसल्याचे कारण दुकानदारांकडून पुढे केले जात आहे. तर काही दुकानदारांनी धान्य घेणेच बंद केले आहे. त्यामुळे धान्य न उचलणाऱ्या दुकानदारांवर नोटीस देऊन कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वस्त धान्य विभागाची पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशी तीन परिमंडले आहेत. या तीनही परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस यंत्र बसविण्यात आली आहेत. तसेच ही यंत्रणा ऑनलाइन आहे. ऑनलाइन यंत्रणेमुळे दैनंदिन किती धान्याचे वितरण झाले याची नोंद लगेचच ऑनलाइन पद्धतीने होते. पीओएस यंत्र बसविण्याच्या आधी पुरवठा विभागातर्फे प्रत्येक शिधापत्रिकांमधील लाभार्थीचे आधार कार्ड शिधापत्रिकेला जोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र, आधार जोडणीचे काम नव्वद टक्केच पूर्ण झाले आहे. एक मार्चपासून पीओएस यंत्राच्या मदतीने लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. पीओएस यंत्रामध्ये लाभार्थ्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेऊनच धान्य दिले जाते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानामधील धान्याचा काळाबाजार संपला आहे. दर महिन्याच्या कोटय़ातून जो माल शिल्लक राहील, तेवढा माल वजा करून पुढील महिन्याचे धान्य दुकानदारांना देण्याची पद्धती अवलंबली जात आहे.

पीओएस यंत्रामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरणामध्ये काळाबाजार करता येत नसल्याने त्यांच्याकडून दुकाने परवडत नसल्याची ओरड होत आहे. काही दुकानदारांनी दुकानाचा परवाना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही दुकानदार पुरवठा विभागाकडून धान्य उचलत नाहीत. त्यामुळे त्या परिसरातील ग्राहकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. धान्य न मिळाल्याने अन्याय होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. ग्राहकांच्या धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिमंडल अधिकाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्वस्त धान्य दुकानांची तपासणी सुरू आहे. जे दुकानदार धान्याचा आवश्यक कोटा घेत नाहीत, अशा दुकानदारांना नोटीस पाठविण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे निगडी येथील परिमंडल अधिकारी दिनेश तावरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पीओएस यंत्र बसविल्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून पूर्वीप्रमाणे शिल्लक राहिलेले धान्य त्यांना बाजारात विकता येत नसल्याचे उघड झाले आहे.

परिणामी स्वस्त धान्य दुकाने चालवणे परवडत नसल्याची ओरड केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 3:29 am

Web Title: pds shopkeepers face difficulty to run ration shops in pimpri chinchwad city
Next Stories
1 पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून मेस चालक महिलेचा मृत्यू 
2 दुर्देव! पुण्यात स्विमिंग पूलवरुन जीवरक्षक गायब, मुलाचा बुडून मृत्यू
3 व्हिडिओ : आईसक्रिम आणि चॉकलेटचे बिल देण्यावरून दुकानदारास मारहाण
Just Now!
X