अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ पुण्यातील सर्वपंथीय ख्रिश्चन समाजातर्फे मंगळवारी (२४ मार्च) ‘शांती मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
 या पत्रकार परिषदेत बिशप नरेश अंबाला, फादर माल्कम सिक्वेरा, रेव्ह. चित्रलेखा जेम्स तसेच समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बिशप डाबरे यांनी अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करून सांगितले की, हा शांती मोर्चा मंगळवारी सकाळी ९ वाजता बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स हायस्कूल येथून निघणार असून जहांगीर रुग्णालय, साधू-वासवानी पुतळामार्गे जिल्हा परिषद येथून कौन्सिल हॉलपर्यंत जाईल. या वेळी ख्रिश्चन सभासद मोठय़ा संख्येत उपस्थित राहणार आहेत. मोर्चात सर्व जातीधर्माच्या, पंथाच्या लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आहे.
आमिष, बळजबरी, फसवणूक हे आमच्या समाजावर होत असलेले आरोप खोटे आहेत. तसेच आम्ही धर्मातर मानत नसून कोणाला कोणता धर्म पाळायचा हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, असे बिशप डाबरे यांनी सांगितले.