लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या गाभाऱ्याचे शिखर चांदीच्या पत्र्याने मढवून कळसाला सुवर्णलेपन करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. भाविकांनी देणगी स्वरूपामध्ये दिलेल्या रकमेचा विनियोग या कामासाठी केला जात आहे.
ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने गाभाऱ्याचे शिखर चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढवून कळसाला सुवर्णलेपन करण्याचा संकल्प अक्षयतृतीयेला केला होता. त्यानुसार भाविकांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून कळसाच्या सुवर्णलेपनाचे काम प्रगतिपथावर आहे. आठ दिशांचे अधिपती असलेल्या अष्टदिग्पालांच्या मूर्ती कळसावरील चांदीच्या पत्र्यामध्ये साकारण्यात येत असून सुवर्णलेपनही करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी दीडशे किलो चांदी आणि एक किलो सोन्याची आवश्यकता आहे. रौप्यमंडित शिखर आणि कळसाला सुवर्णलेपनाचे काम पु. ना. गाडगीळ आणि सन्समार्फत तज्ज्ञ कारागिरांच्या सहभागातून विनामूल्य केले जात आहे. या उपक्रमासाठी भाविकांकडून आलेल्या देणगीतून काम सुरू असून, दत्तमहाराजांच्या हातातील शुभंकर चिन्हेदेखील या कळसावर साकारण्यात आली आहेत. दत्तजयंती म्हणजेच २४ डिसेंबपर्यंत हे काम पूर्णत्वास नेण्याचा ट्रस्टचा मानस असून, औपचारिक उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी दिली.
कळसाचे काम अतिम टप्प्यामध्ये आले असून या उपक्रमासाठी भाविकांकडून रोख रक्कम, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे अथवा वस्तुरूप देणगी स्वीकारण्याची व्यवस्था मंदिरामध्ये करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.