नियोजनाचा अभाव, अतिक्रमणांमुळे वाहतुकीत वाढ; महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी महापालिकेने शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात रस्ते रूंद केले. कोटय़वधी रूपये खर्च करून चौकांचे सुशोभीकरणही केले. हे करत असताना सर्वसामान्य पादचाऱ्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये पादचारी पूर्णपणे असुरक्षित आहेत. रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते आहे. महापालिकेकडून मात्र कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. एखादी दुर्घटना झाल्यानंतरच पालिकेचे डोळे उघडणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नाशिकफाटा, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरीतील चौकांसह चापेकर चौक, काळेवाडी तसेच डांगे चौक आदी शहरातील प्रमुख चौक मानले जातात. यासह शहरातील बहुतांश प्रशस्त अशा रस्त्यांवरून चालणे पादचाऱ्यांसाठी अतिशय अवघड बनले आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठे रस्ते असूनही नियोजनाचा अभाव व अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो आहे. वाहनस्वारांच्या एकमेकांच्या पुढे जाण्याच्या चढाओढीत सर्वसामान्य नागरिकांचे मात्र मरण झाले आहे. थोडय़ाफार फरकाने सर्वच ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.

कासारवाडीत नाशिकफाटा चौकात सकाळपासून वर्दळ सुरू होते. रेल्वे स्थानक व एसटीचा थांबा याच ठिकाणी आहे. पुलाच्या खालील भागात नव्यानेच दुकाने थाटण्यात आली आहेत. पूर्वी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहनांची कोंडी होत होती. त्यासाठी उपाय म्हणून दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र, अपेक्षित फरक पडलेला नाही. बरीच कामे अर्धवट राहिली असल्याने चौकातील सिग्नल कायम राहिला आहे. या ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे वाहतुक कोंडीची मूळ समस्या कायम राहिली आहे. भल्या मोठय़ा चौकात एकीकडून दुसरीकडे जाणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचा अनुभव शेकडो नागरिक रोज घेत आहेत. हीच परिस्थिती पिंपरी चौकात आहे. कोणत्याही बाजूने कुठेही जाण्याचा प्रयत्न केला असता, वाहने अंगावर येतात. चिंचवड तसेच आकुर्डी चौकात वेगळी परिस्थिती नाही. आकुर्डीच्या भर चौकात शाळा असल्याने त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. भक्ती शक्ती चौकात सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याआधी नागरिकांना रस्त्यावरून चालणे दिव्य होते. चापैकर चौकात सात रस्ते एकत्र येतात. त्यामुळे वाहनांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी अतिक्रमणांनी कहर केला आहे, त्यामुळे सामान्यांना चालणे अवघड बनले आहे. काळेवाडी तसेच थेरगावच्या डांगे चौकातून जाणाऱ्यांना काय कसरत करावी लागते, याचा अनुभव येथून नियमितपणे जाणारे घेत आहेत. प्रमुख रस्ते व चौकांमध्ये ही परिस्थिती दररोज दिसून येते. अनेक छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात. मात्र, ठोस अशी कार्यवाही महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय पालिकेचे डोळे उघडणार नाहीत व त्याशिवाय उपाययोजना होणार नाहीत, अशीच भावना नागरिकांच्या मनात आहे.