मोटारसायकलवरून घरी निघालेल्या तरुणाला एका मोटारीने विरुद्ध दिशेला येत धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आणि घरातील एकुलता एक कमवता मुलगा गेल्यामुळे कुटुंबावर संकट ओढावले. मुलाच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळावी म्हणून न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, दाव्याच्या निकालाला वेळ लागेल म्हणून दोन्ही बाजूने हा दावा तडजोडीने मिटविण्याचे ठरले. विमा कंपनीने त्या कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसान भरपाई देत दावा तडजोडीने मिटवला.
निकेतन शांताराम वायकर (वय २४, रा. आर्वी, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. निकेतन हा त्याच्या चुलत भावासोबत मोटारसायकलवरून २७ जून २०१३ रोजी घरी निघाले होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारीने त्यांना धडक दिली. यामध्ये निकेतनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ जखमी झाला होता. निकेतन हा कार्यकारी सोसायटीमध्ये काम करीत होता. त्याला साधारण सात हजार रुपये पगार होता. घरातील एकुलता एक कमवता असल्यामुळे आणि त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले.
या प्रकरणी नुकसान भरपाई मिळावी म्हणून निकेतनच्या वडिलांनी अॅड. अतुल गुंजाळ यांच्या मार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. दावा चालल्यानंतर लागणारा वेळ पाहता अॅड. गुंजाळ व दी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने हा दावा तडजोडीने मिटविण्याचे ठरविले. त्यानुसार रविवारी झालेल्या महालोकअदालतीमध्ये हा दावा ठेवण्यात आला. न्यायाधीश डी. एम. देशमुख यांच्या पॅनलसमोर हा दावा तडजोडीने मिटवून पीडितांना आठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. एका महिन्यात वायकर कुटुंबीयांना आठ लाख रुपये कंपनीकडून दिले जाणार आहेत, असे अॅड. गुंजाळ यांनी सांगितले.