पार्ले कंपनीच्या खाद्यपदार्थाच्या सीलबंद डब्यात केस आढळल्याच्या प्रकरणात ग्राहक मंचाने कंपनीच्या विरोधात निकाल दिला असून, याबाबत तक्रार करणाऱ्या ग्राहकाला दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सीलबंद डब्यात केस दिसत असल्याने त्याची प्रयोगशाळेत चाचणी करण्याची कंपनीची मागणीही न्यायमंचाने फेटाळून लावली. पुणे ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य गीता घाटगे यांनी गेल्या आठवडय़ात हा निकाल दिला.
विशाल वत्स (रा. नोव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आयएनएस शिवाजी, लोणावळा) यांनी मंचाकडे पार्ले प्रॉडक्ट्स प्रा. लि. विलेपार्ले, विक्री प्रमुख आणि भाडळे वेअर हाऊस वाघोली यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. वत्स लोणावळा येथील नौदलाच्या नोव्हल कॉलेज ऑफ इंजिनिअयरींग येथे अधिकारी म्हणून काम करतात. ते राहण्यासाठी लोणावळा येथेच आहेत. ११ जून २०१० रोजी पुण्यातील साळुंके विहार येथील विजय प्रोव्हिजन स्टोअर्स मधून १६० ग्रॅमचे काचेतील सीलबंद पार्ले चिझलींग्स घेतले होते. त्यात त्यांना केस आढळून आला. स्थानिक डीलरने त्या डब्याची पहाणी करून त्याचा बॅच नंबर नोंदवून घेतला. याप्रकरणी वत्स यांनी पार्ले कंपनीला ईमेल पाठवून कळविले होते. मात्र, त्याच्या ईमेलकडे कंपनीने दुर्लक्ष केले.
याप्रकरणी वत्स यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. मंचाने कंपनीला नोटीस पाठविल्यानंतर त्यांच्याकडून मंचाकडे म्हणणे मांडण्यात आले. कंपनीकडून उत्पादित करण्यात येत असलेले खाद्यपदार्थ यंत्राचा वापर करून तयार केले जातात. त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती नसते. पूर्णपणे स्वच्छता राखून खाद्यपदार्थ केले जातात. त्यामुळे डब्यात केस आढळणे शक्य नाही, असा बचाव कंपनीकडून करण्यात आला होता. रिटेलरकडे खाद्यपदार्थ पोहोचल्यानंतर ते काळजीपूर्वक हाताळले गेले नसेल. त्याचबरोबर ज्या डब्यात केस आढळला, त्या डब्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद कंपनीकडून केला होता. तक्रारदारानी केलेली मागणी फेटाळण्याची मागणी केली होती. मंचाने निकाल देताना, डब्यातील केस हा सरळ डोळ्यांना स्पष्टपणे दिसतो. यामुळे डब्याची प्रयोगशाळेत तपासणी अथवा इतर पुराव्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करत कंपनीने तक्रारदार यांना नुकसानभरपाई आणि दंड म्हणून दहा हजार रुपये देण्याचा आदेश दिला.