विवाहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी संगणक अभियंता असलेल्या तरुणाने थायलंडला जायचे ठरविले होते. त्यासाठी त्याने सचिन टूरिझम वर्ल्ड (सचिन ट्रॅव्हल्स कंपनी) या कंपनीकडे एक लाख ३७ हजार रुपये भरले. मात्र, कंपनीने प्रवासाला निघायच्या तारखेच्या अगोदर चार दिवस थायलंडची सहलच रद्द झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्या तरुणाने सचिन ट्रॅव्हल्सकडे पैसे परत मागितले. संबंधितांनी त्यासाठी बँकेचा धनादेश दिला पण तोही वटला नाही. त्यामुळे अखेर त्याने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयाने सचिन ट्रॅव्हल्स कंपनीने संबंधित तरुणाला नुकसान भरपाई व खटल्याचा खर्च म्हणून अकरा हजार रुपये आणि प्रवासासाठी घेतलेले एक लाख ३७ हजार रुपये परत करण्याचा आदेश दिला आहे.
अपूर्व प्रकाश बर्वे (रा. नारायण पेठ) या अभियंता तरुणाने सचिन ट्रॅव्हल्स कंपनीच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयाच्या विरोधात ग्राहक मंचाकडे दाद मागितली होती. त्यानुसार मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी सचिन ट्रॅव्हल्स कंपनीने नुकसान भरपाई आणि घेतलेली रक्कम बर्वे यांना देण्याचा आदेश दिला आहे. अपूर्व संगणक अभियंता असून विवाहाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी थायलंडला पर्यटनासाठी जायचे ठरविले होते. त्या वेळी त्यांनी सचिन ट्रॅव्हल्स कंपनीची थायलंड पर्यटनाची जाहिरात पाहिली. त्यानुसार चौकशी करून त्यांनी पहिल्यांदा ६७ हजार आणि दुसऱ्या वेळी ६९ हजार रुपये असे दोन धनादेश कंपनीला दिले. सचिन ट्रॅव्हल्स कंपनीने त्यांना थायलंडला जाण्यासाठीची तारीख सांगितली. त्यानुसार ते तयारीला लागले. मात्र, प्रवासाला जायच्या अगोदर चार दिवस त्यांना काही अडचणींमुळे ही सहल रद्द केल्याचे सांगण्यात आले आणि घेतलेली रक्कम परत दिली जाईल, असेही सांगितले गेले. मात्र, पुढे कंपनीने पैसे न दिल्यामुळे बर्वे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांना धनादेश देण्यात आला; पण तो बँकेत वटला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा कंपनीकडे तक्रार केली.
या तक्रारीनंतर कंपनीने पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. पण, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. म्हणून बर्वे यांनी ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला. ग्राहक मंचाने सचिन टूरिझम वल्र्ड यांना नोटीस काढली. मात्र, कंपनीचे प्रतिनिधी मंचापुढे हजर राहिले नाहीत. त्यामुळे मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फी आदेश दिला. ग्राहकाला सदोष सेवा दिल्याप्रकरणी सचिन टूरिझम वर्ल्ड यांनी तक्रारदार बर्वे यांच्याकडून घेतलेली एक लाख ३७ हजार ४७७ रुपये अधिक नुकसान भरपाई म्हणून दहा हजार रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून एक हजार असे अकरा हजार रुपये देण्याचा आदेश दिला.