वर्षांपासूनची थकबाकी अवघ्या अडीच महिन्यांत पालिकेकडे जमा

िपपरीतील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान या संस्थेने नियोजित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी आवश्यक असलेल्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी दोन कोटी ५७ लाख रूपयांची थकबाकी भरल्याचे प्रकरण ताजे असतानाच, विविध मिळकतींची आणखी दोन कोटींची थकबाकी संस्थेने महापालिकेकडे जमा केली आहे. वर्षांनुवर्षे थकलेली थकबाकींची कोटय़वधींची रक्कम संस्थेने इतकी तत्परता दाखवून गेल्या अडीच महिन्यात भरली, यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. आणखी १४ कोटींच्या थकबाकींचे प्रकरणही न्यायालयात असून ती रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या मालकीचे भोसरीतील दोन मोठे भूखंड व काही मोकळी जागा आहे, या मिळकतींना पालिकेने एक एप्रिल २०१३ पासून करआकारणी सुरू केली. आयुर्वेद रूग्णालय व संशोधन केंद्रासाठी दोन इमारती उभारण्यात येत असून त्यासाठी वैद्यकीय विभागाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची गरज होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत संस्थेकडून कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, त्यावर ‘न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच प्रमाणपत्र देऊ’ अशी भूमिका पालिकेने घेतली. त्यामुळे व्यवस्थापनाने एका भूखंडाचे एक कोटी ५० लाख आणि दुसऱ्या भूखंडाचे ८२ लाख ४४ हजार रूपये असे दंडासह अडीच कोटी रूपये महापालिकेकडे जमा केले.

निगडी प्राधिकरण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे २०१४ पासून थकलेले मिळकतकराचे १४ लाख ४० हजार रूपये संस्थेने भरले आहेत. ताथवडे येथील हॉटेल मॅनेजमेन्टचे २०१० पासून थकलेले ८० लाख ३० हजार रूपये, मासूळकर कॉलनी येथील इमारतीचे ३७ लाख, यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील भाडेस्वरूपात थकलेले ३४ लाख रूपये, संत तुकारामनगर येथील मोकळी जागा (१) चे – एक लाख ५८ हजार, मोकळी जागा (२) चे – १५ लाख ३१ हजार रूपये, मोकळी जागा (३) चे – १९ लाख २२ हजार रूपये, मोकळी जागा (४) चे – २४ लाख रूपये असे सर्व मिळून चार कोटी ६३ लाख रूपयांच्या थकबाकीचा भरणा संस्थेने सात जुलै ते २६ सप्टेंबर २०१६ या कालावधीत केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकलेली ही रक्कम संस्थेने इतक्या तत्परतेने भरली, याचे गूढ आहे. असलेली थकबाकी आणि भरलेली रक्कम यात तफावत असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, या विषयी पालिका अधिकारी मौन बाळगून आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाची १४ कोटींची थकबाकी

िपपरीतील डॉ. डी. वाय. पाटील दंतकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महिला वैद्यकीय महाविद्यालयाची १४ कोटी ६३ लाखांची थकबाकी आहे. २००२ पासून ही थकबाकी असल्याची नोंद पालिकेकडे आहे. संस्थेने ‘कलम १३२’ नुसार मिळकतकरात माफी मिळावी, अशी मागणी पालिकेकडे केली होती. तर, अशाप्रकारे माफी देता येत नाही, असे पालिकेचे म्हणणे होते. त्यामुळे संस्थेने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पालिकेला मिळकत वसुली करण्यास मनाई आदेश दिला आहे.