इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती जाहीर होऊनही तांत्रिक कारणांमुळे ती न मिळालेल्या राज्यातील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करून त्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम तुटपुंजी असताना तांत्रिक अडचणींमुळे शिष्यवृत्तीच न मिळण्याच्याही तक्रारी आहेत.

या पाश्र्वभूमीवर, शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ती मिळवून दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, खाते क्रमांक चुकणे, आयएफएससी कोड चुकणे अशा काही तांत्रिक चुकांमुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकलेली नाही. २००९ पासून २०१८ पर्यंतच्या वर्षांतील सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.

‘राज्यातील शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार शाळांना विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये बँक खात्याच्या माहितीची दुरुस्ती करण्यास सांगण्यात येईल. शाळांनी दुरुस्ती केल्यानंतर त्याची खात्री करून घेऊन विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल,’ असे माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.