७० वर्षात जे घडलं नाही, ते या महिन्यात घडलं असून दसऱ्याच्या दिवशी उत्तर भारतात रावण दहन न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केलं गेलं. जे सत्तर वर्षात कधी ही झालं नव्हतं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनी म्हटलं आहे ते पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे ‘किसान अधिकार दिनानिमित्त’ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी संघावर देखील सडकून टीका केली आहे.

महाजन म्हणाले की, “७० वर्षात न घडलेली घटना ऑक्टोबर महिन्यात घडली. दसऱ्याच्या दिवशी उत्तर भारतामध्ये रावण दाहणाचा कार्यक्रम असतो. दुराचाराच, वाईट गोष्टींचं प्रतीक म्हणजे रावण, त्याच दहन करायचं. या दसऱ्याच्या दिवशी रावण दहन न होता मोदी दहन झालं. मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले”

पुढे ते म्हणाले की, “या आधी पंतप्रधानाच्या धोरणांविरोधात विरोध नोंदवला. भांडण केली, संसदेत प्रश्नोत्तरे केली. पण कधी कोणी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे रावण म्हणून दहन केले नाही. याचा अर्थ असा की गेल्या सहा वर्षांमध्ये सर्व सामान्य प्रजा इतक्या टोकाला जाऊन पोहचली आहे की ते प्रत्यक्ष पंतप्रधान यांना रावण म्हणून दहन केलं. लोकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, असंतोष याच हे प्रतीक आहे” असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

देशातील ६४ टक्के लोक संघ परिवार आणि भाजपाच्या विरोधात
महाजन म्हणाले की, “पंतप्रधान निवडीपासून सर्व गोष्टींमध्ये संघांचा हस्तक्षेप आहे, भारतीय जनता पक्षात बाहेरून झालेली आयात वगळता मूळ भारतीय जनता पक्षाचे जी लोक आहेत. ते आधी संघाचे स्वयंसेवक आहेत आणि मग भाजपाचे सदस्य. भाजपची अवस्था म्हणजे उदार उसनवारी चालणारा संसार, अनेकांना पक्षात घेतलं. आपलं जेव्हा कमी पडत तेव्हा बाहेरून गोळा करावं लागतं”