दरवर्षी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करून वेगवेगळे तंत्र वापरून शहरातील पवना नदी स्वच्छ आणि जलपर्णी मुक्त करण्याचा प्रयत्न करत असते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जलपर्णी आणि महानगरपालिकेचं कंत्राट हे नातं सुरूच आहे, पण जलपर्णी नष्ट होत नाही. यासाठीच वाल्हेकरवाडी मधील रोटरी क्लबच्या माध्यमातून जलपर्णी काढण्याच काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी ७० ट्रक जलपर्णी काढली आहे.

वाल्हेकरवाडी रोटरी क्लब यांच्या मार्फत जलपर्णी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जलपर्णी काढण्यासाठी ३५ ते ४० मजूर नेमण्यात आले असून याठिकाणी जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र बीज येण्यापूर्वीच जलपर्णीचा नायनाट होत असल्याने पवनानदी मोकळा श्वास घेणार आहे. गेल्या एक महिन्यांपासून हे मजूर काम करत असून सहा किलोमीटरच्या परिसरातील ७० ट्रक जलपर्णी काढली आहे. यामुळे चिंचवड ते दापोडी हे नदीपात्र जलपर्णी मुक्त राहील आहे. सध्य स्थितीला २५ टक्के जलपर्णी राहिली आहे ती देखील येणाऱ्या जानेवारीपर्यंत समूळ नष्ट करणार आहोत, असा मानस वाल्हेकरवाडी रोटरी क्लब यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना विविध सामाजिक संघटनांनी जलपर्णी काढण्यास हातभार लावला. त्याचबरोबर बालगोपाळांसह विद्यार्थी देखील सहभागी झालेले होते. सकाळी आठ वाजल्यापासून जलपर्णी काढण्याचं काम सुरू होतं.

या मोहिमेत नागरिकांनी मोठ्याप्रमाणात सहभागी होऊन ही लोकचळवळ करावी अशी अपेक्षा येथील रोटरी क्लबच्या अध्यक्षांकडून व्यक्त करण्यात आली. अशाच प्रकारचं काम हे दोन वर्षे केलं तर पिंपरी-चिंचवड मधील पवनानदी जलपर्णी मुक्त होईल, यात काही शंका नाही. मुख्य म्हणजे ड्रेनेजचे पाणी हे जलपर्णीचे मुख्य खाद्य असल्याने जलपर्णी वाढते. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील ड्रेनेजचे पाणी हे थेट पवना नदीत सोडले जाते. याविषयी देखील विचार करण्याची गरज प्रशासनाला आहे.