लोणावळा ते पुणे दरम्यान जी लोकल सेवा सुरू आहे ती दररोज अनेक नागरिक वापरतात. पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे शहर या ठिकाणी लोणावळ्यापासून मावळ परिसरातले अनेक नागरिक नोकरी करतात. पुणे, पिंपरीपासून लांबच्या अंतरावर राहणाऱ्या लोकांना याच लोकलचा आधार असतो. मात्र या लोकल अनेकदा वेळेवर येतच नाहीत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होतो.

याच रोषातून आज नोकरदार प्रवाशांनी वर्गाने पिंपरी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे ही तब्बल १५ मिनिटं थांबवून आपला संताप व्यक्त केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत प्रवाशांनी अगोदर चिंचवड, पिंपरी, कासारवाडी आणि दापोडी येथे लोकल थांबवली होती अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे.

पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे तर पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी मानली जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आणि पुणे येथे अनेक नागरिक, तरुण हे शिक्षणासाठी आणि कामासाठी दाखल होतात. पर्याय म्हणून ते रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थाना बसला आहे.

लोकल कधीच वेळेवर येत नसल्याची ओरड प्रवाश्यांमध्ये आहे. प्रवाशी वेळवेवर पाहिजे त्या ठिकाणी पोहचत नसल्याने आज सकाळी लोणावळा-पुणे लोकल रेल्वेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोणावल्यावरून निघालेली साडे नऊ ची लोकल नागरिकांनी चिंचवड येथे काही मिनिटं त्यानंतर पिंपरी रेल्वे स्थानकात १५ मिनिटं तर कासारवाडी, दापोडी येथे काही मिनिटं अडवून धरली होती. अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे. त्यामुळे इथून पुढे तरी रेल्वे (लोकल) वेळेवर येते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.