प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे असं मत काँग्रेसचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी व्यक्त केले आहे. प्रियंका गांधी यांची काही दिवसांपूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. प्रियंका यांच्या राजकाराणातील प्रवेशाबद्दल सिद्धू यांनी आज पुण्यामधील एका पत्रकारपरिषदेमध्ये आपले मत व्यक्त केले.

प्रियंका यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगताना आता राहुल प्रियंका एकत्र लढतील असंही सिद्धू यांनी सांगितले. ‘कालपर्यंत राहुल गांधी एकटेच लढत होते. मात्र आता त्यांना प्रियांका गांधी यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे आता ‘एक ओर एक ग्यारा आणि बीजेपी नऊ दो ग्यारा’ होणार आहे, अशा शब्दात त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. प्रियंका यांना देण्यात आलेले काम हे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रियंका यांच्या खांद्यावर देशातील सर्वात अवघड भाग समजला जाणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला प्रियांका गांधींमध्ये इंदिरा गांधींची छबी दिसते. यामुळेच प्रियंकांच्या येण्याने काँग्रेसला निश्चितच फायदा होईल असं मत सिद्धू यांनी व्यक्त केले.

देशावरील राहु आणि केतूचे ग्रहण लवकरच जाणार

सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरला आहे. जिथे अहंकार येतो तिथे विनाश निश्चित असतो. या सरकारच्या दबावामुळे निवडणूक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. मात्र देशावरील राहु आणि केतूचे ग्रहण लवकरच जाणार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली.

केंद्रातील भाजप सरकारकडून विविध भागात कोणत्याही व्यक्तिने समस्येबद्दल आवाज उठवल्यास भाजपच्या मंत्र्याकडून संवाद साधला जात नाही. हे केवळ दंडातंत्रच्या माध्यमातून संवाद साधत आहेस. सध्या देशामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेती मालास भाव नाही, तरुण वर्गाला नोकर्याय नसल्याने आलेल्या नैराश्यमुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र यासंदर्भात सरकार काही करताना दिसत नसल्याचा आरोपही सिद्धू यांनी केला आहे. ‘नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येईल’ असे पंतप्रधान सांगत होते. मात्र अजून तो पैसा बाहेर आला नसून स्विस बँक, जागा आणि सोन्यामध्ये गुंतवला असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानावर निशाणा साधला. याचबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत एका दिवसात ७५० कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित करत ते कोणत्याही रांगेत उभे दिसले नाही अशी टिकाही त्यांनी केली.