News Flash

प्रेरणा: क्षितिज विस्तारताना…

पैशाचे मोल आणि ती वापरण्याची जीवनमूल्ये शालेय जीवनातच मिळाली तर हा दुग्धशर्करायोग ठरू शकतो. हा अनुपम योग सर्वांच्या आयुष्यात येतोच असे नाही

पहिले छायाचित्र क्षितिजा आगाशे तर दुसरे छायाचित्र राणी थोपटे यांचे.

मुलांचे क्षितिज विस्तारण्याच्या कार्यासाठी धडपडणाऱ्याया नाट्यशिक्षिका क्षितिजा आगाशे. वस्तीपातळीवरील मुलांना शिकवण्याच्या कामात अग्रेसर. त्यांची आणि ‘निरामय’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भेट झाली. मुलींच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांबरोबरच आरोग्याचा विकास होण्याच्या दृष्टीने जागृती करणारी ही संस्था. या संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्पावर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या राणी थोपटे. त्यांच्याशी चर्चा करून वस्तीपातळीवरील मुलींचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे तसेच त्यांचे आत्मभान जागृत करण्याचे कार्य या दोघींनी हाती घेतले. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांना पैशाचे मोल जाणवून देण्याबरोबरच स्वकष्टातून आर्थिक क्षमतांचे विकासीकरण करण्याचा चंग या दोघींनी बांधला. यातून वस्तीपातळीवरील मुलींचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक तर झालाच, पण त्याबरोबरच त्यांची अभ्यासात आणि जीवनमानातही प्रगती झाली.- श्रीराम ओक

क्षितिज विस्तारताना…

‘पैसा’ हा शब्द छोटा, पण गहिऱ्या अर्थाचा आणि अर्थाइतकाच महत्त्वाचाही. एखाद्याची पत ठरवण्यात अग्रेसर असणारा हा शब्द आणि त्यातून मिळणारे ‘अर्थ’ जीवनमान उंचावण्यात जेवढी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावते, तेवढीच एखाद्याच्या जीवनाला स्थैर्य देण्यातही आवश्यक कामगिरी करते. पैशाचे मोल आणि ती वापरण्याची जीवनमूल्ये शालेय जीवनातच मिळाली तर हा दुग्धशर्करायोग ठरू शकतो. हा अनुपम योग सर्वांच्या आयुष्यात येतोच असे नाही, पण पुण्यातील काही मुलींच्या आयुष्यात हा योग आला. जीवनमूल्य शिकत असतानाच मुलींची आणि परंपरांची ओळख झाली आणि त्यांना त्याच्या प्रसारकार्यातही सहभागी होता आले. इतकेच नाही, तर त्याचे आर्थिक मोलही मिळाले, ज्यातून त्यांना आपल्या कुटुंबीयांवरचा शैक्षणिक भार कमी करता आला आणि ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’, हा मार्गही मिळाला. त्यांना हा मार्ग चोखाळता यावा, यासाठी क्षितिजा अजय आगाशे आणि राणी गणेश थोपटे या दोघी ‘निरामय’ संस्थेच्या माध्यमातून मोलाची कामगिरी करीत आहेत.

संस्थेचा किशोरी शक्ती प्रकल्प रोज तीन तास चालतो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकसनास सहकार्य करीत असतानाच त्यांचा अभ्यास, आरोग्य समस्या, खेळ आदी उपक्रमांना या प्रकल्पात स्थान देण्यात आले आहे. या प्रत्येक वर्गाला सुमारे चाळीस मुली असतात. यातील मुलींना ‘मंगळागौरीच्या खेळांच्या सादरीकरण’ उपक्रमात सहभागी करून घेतल्यानंतर त्या मुलींना सन्मानपूर्वक काम करू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्याचे राणी थोपटे सांगतात. या सादरीकरणाच्या माध्यमातून हसतखेळत, गाणी म्हणत, स्वावलंबनाच्या मार्गाने तिसरी ते नववीपर्यंत चाळीस मुली स्वत:चा शैक्षणिक खर्च स्वत:च उचलू लागल्या. मागील आठ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यात नव्या येणाºया मुलींची संख्यादेखील वाढते आहे. केळेवाडी वस्तीतील मुली या सादरीकरणात तरबेज झाल्या असून, यंदाच्या वर्षी गोसावी वस्तीमध्ये मुलींनादेखील हे खेळ शिकविण्यात आले. यंदाच्या वर्षीपासून तेथील मुलीही मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण करण्यास सज्ज झाल्या आहेत.

ग. रा. पालकर शाळेत तसेच सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाट्यशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या क्षितिजा यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची तळमळ होती. लहानपणी घरात काम करणाऱ्या मावशींना साक्षर करण्यापासून त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. हा गुण त्यांच्या आजीकडून त्यांना मिळाला. त्यांचे वडील बँकेत नोकरी करत असतानाही विविध सामाजिक कार्यक्रमांत सहभागी होत असत. ते कार्य त्यांनी निवृत्तीनंतरही सुरूच ठेवले. आईवडिलांबरोबरच पतीच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे दोन मुलांच्या पालनपोषणात महत्त्वाची कामगिरी बजावत असतानाच, त्यांनी सामाजिक कार्यही सुरूच ठेवले.

गोसावी वस्तीतील मुलींना इंग्रजी शिकवण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस त्या नित्यनेमाने जात असून, त्यांना स्पोकन इंग्लिशबरोबर लेखनात समर्थ करण्यासाठीदेखील त्या झटत आहेत. ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’मुळे क्षितिजा यांचा नाट्यजीवनाशीही जवळचा संबंध. त्यांच्या डोक्यात मंगळागौरीच्या खेळांच्या सादरीकरणात या मुलींचा सहभाग करून घेता आले तर त्यांना आर्थिक सक्षम बनविण्यास मदत होईल ही कल्पना आली. या कल्पनेस वास्तव रूप देत असताना त्यांचा राणी थोपटे यांच्याशी संवाद झाला आणि या दोघींनी एकदिलाने या कार्यासाठी आपला प्रवास सुरू केला.

क्षितिजा यांच्या बरोबरच वर्षा कोंडेजकर, देवयानी पाटणकर यांनीही मंगळागौरीचे खेळ मुलींना शिकवण्यास सुरुवात केली. ताल, लय, शारीरिक लवचिकपणा यांचा त्रिवेणी संगम साधत राणीताईंच्या बरोबरीने मुलीही उत्तम खेळायला शिकल्या. यात पारंपरिक फुगड्या, झिम्मा, फेर, आगोटा पागोटा आदींबरोबर आधुनिकतेचीही जोड देत ‘मुलगी वाचवा’, ‘पाणी बचत’, ‘वृक्षसंगोपन’ आदी सामाजिक विषयांवर संदेश देत हे खेळ रंगत जाऊ लागले. या खेळांमुळे नुसते आर्थिक बळच नाही, तर मुलींच्या सर्वांगीण विकासास मदत झाली. त्यांचे क्षितिज विस्तरण्याच्या या कार्यात सुरुवातीला क्षितिजा आणि राणी यांनी प्रचंड मेहनत घेत या खेळांच्या सादरीकरणाची कल्पना विविध ठिकाणी सांगितली. त्यांच्या परिश्रमांना यश मिळत गेले. विविध सोसायट्या, मैत्रिणींच्या, नातेवाइकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी सादरीकरणास सुरुवात झाली. बघता बघता कार्यक्रम मिळत गेले. या कार्याची सुरुवात एकंदरीतच कष्टप्रद होती. ‘आमच्या मुली नाचगाणी करून पैसा मिळवणार नाहीत’ असे पालकांचे परखड बोलदेखील या कार्यकत्र्या भगिनींना ऐकून घ्यावे लागले होते. पालकांशी सुसंवाद साधून हे पारंपरिक गीतांचे सादरीकरण करीत आपली संस्कृती जपण्याचा प्रयास असल्याचे समजावून द्याावे लागले. यानंतरही काही काळ जावा लागला. पालकांच्या मनात हळूहळू विश्वाास निर्माण झाला. एखादा चमत्कार व्हावा, याप्रमाणे कष्टकरी मातांनीही एक संघ तयार करून काही कार्यक्रमांचे सादरीकरण करून वाहवा मिळवली. यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम करून या मुलींच्या सादरीकरणाला दाद देत असताना, ‘कमवा आणि शिका’ योजनेला हातभार लावायचा असल्यास क्षितिजा आगाशे यांच्याशी ९८८१०९५५६३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या सादरीकरणातून मुलींच्या शिक्षणासाठी, विकासासाठी आर्थिक साथ मिळत गेली त्याच्या दोघी साक्षीदार आहेत. या कार्यक्रमांचा एकत्रित हिशोब करून मुलींसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यापासून, दिवाळीच्या निमित्ताने छंदांमधून व्यावसायिकतेकडे जाण्यात या पैशाची मदत होते. मंगळागौरी सादरीकरणाच्या निमित्ताने या मुलींना व्यायामाचे महत्त्वदेखील समजले. या मुली पोहण्याचा व्यायामदेखील करतात, त्यासाठी आवश्यक असणारा पोहण्याचा वेषदेखील त्यांनी या पैशामधूनच खरेदी केला. याशिवाय दप्तर, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात त्यांना मिळविलेल्या पैशाचा उपयोग होतो. मिळणाऱ्या पैशाचा विनियोग शिक्षणासाठीच होतो आहे की नाही यासाठीही आगाशे आणि थोपटे जागरूक असतात.

या उपक्रमामुळे मुलींच्या पाठांतराची क्षमता वाढीस लागण्याबरोबरच उच्चार सुधारण्यासही मदत झाली. स्वच्छता, नीटनेटकेपणा, सराव, सातत्य याचे महत्त्व मुलींच्या लक्षात येऊ लागले. त्यांच्या अभ्यासातही प्रगती झाली. याशिवाय स्वप्रतिमा सुधारण्याच्या बरोबरीने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, सकारात्मकता देखील विकसित झाली.

– श्रीराम ओक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 9:00 pm

Web Title: perarna article on kshitija agashe and rani thopte
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या
2 ‘नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाल्याने कंपन्यांची तोडफोड’
3 Maratha Morcha : यापुढे रास्ता रोको नाही, आयोजकांचा निर्णय
Just Now!
X