गेल्या चार वर्षांत ‘सिझेरियन’ (सी-सेक्शन) प्रसूतींच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळत असून चालू वर्षी पुण्यात एकूण प्रसूतीपैकी ३१ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे केल्या गेल्या आहेत. लग्नांचे सर्वसाधारण वय वाढल्यामुळे जोडप्यांनी बाळासाठी उशिरा प्रयत्न सुरू करणे, तसेच जीवनशैलीतील बदलांच्या विपरीत परिणामांमुळे प्रसूतीत अडचणी संभवणे ही याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. परंतु याबरोबरच न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही प्रसूतीबाबत कोणताही धोका न पत्करण्याकडे डॉक्टरांचा कल असल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी पुरवलेल्या माहितीनुसार २०११-१२ मध्ये शहरातील सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण एकूण प्रसूतींमध्ये १३ टक्के होते. २०१२-१३ मध्ये ते वाढून २३ टक्के झाले. २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये एकूण प्रसूतींमधील सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण आणखी वाढून ते अनुक्रमे ३३ टक्के व ३१ टक्के असे राहिले.
दहा वर्षांपूर्वी सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण सर्वसाधारणपणे २० टक्के होते, ते आता ३५ टक्के झाले असल्याचे ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘अधिक वयातील प्रसूतींचे प्रमाण आता वाढले आहे. वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्यांमध्येही वाढ होत असून त्यांच्या बाबतीत प्रसूतीबद्दल अधिक धोका पत्करला जात नाही. जोडप्यांना हल्ली सहसा एक किंवा दोनच मुले असल्यामुळे त्या बाळांच्या वेळी धोका नको असा जोडप्यांचाही कल असतो. पूर्वी गरोदरपणात मधुमेहासारखे आजार असण्याचे प्रमाण कमी दिसायचे. आता तेही वाढले असून अशा महिलांच्या बाबतीतही प्रसूतीत धोका पत्करला जात नाही. याशिवाय न्यायवैद्यकीय खटला संभवण्याच्या दबावामुळेही काही वेळा डॉक्टरांकडून सिझेरियन प्रसूती करण्याकडे कल राहतो.’
डॉक्टर केवळ पैशांसाठी सिझेरियन प्रसूती करतात, हा केला जाणारा आरोप खरा नाही, असे डॉ. गुप्ते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘हल्ली  ‘सिझेरियन’ व ‘नॉर्मल’ दोन्ही प्रकारच्या प्रसूतींसाठी जवळपास सारखाच खर्च येतो. सिझेरियन केल्यामुळे डॉक्टरला मोठा फायदा होतो हा गैरसमज आहे.’
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश भुतकर म्हणाले, ‘विविध वैद्यकीय तपासण्या उपलब्ध झाल्यामुळे बाळ ‘नॉर्मल’ प्रसूतीचा ताण सहन करू शकेल का, अशा गोष्टींची कल्पना आधी येऊ शकते. प्रसूती सिझेरियन करण्यामागे काही कारणे बाळासाठीची तर काही आईसाठीची असतात. शिवाय बाळाच्या आरोग्याच्या बाबतीत काही धोका असल्याचे तपासण्यांवरून कळले असेल, तरी धोका पत्करला जात नाही. अशा वेळी न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही डॉक्टरांकडून सिझेरियनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’

‘ऑन डिमांड’ प्रसूती?
डॉ. संजय गुप्ते म्हणाले, ‘काही जोडपी मुहूर्त पाहून, तसेच आपल्या सोईनेही प्रसूतीचा निर्णय घेताना दिसतात. परदेशात ‘ऑन डिमांड’ प्रसूतीचे प्रमाण ५ टक्के आहे, तर आपल्याकडे ते १ ते २ टक्के आहे.’