निकाल वेळेत जाहीर न होणे, पुढील परीक्षा आल्या तरी आधीच्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल हाती न येणे .. या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या तक्रारी. मात्र, आता पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यार्थ्यांना वेळेवर मिळू शकणार आहे. अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनही संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ निकाल जाहीर होण्यासाठी लागणाऱ्या वेळात फारसा फरक पडणार नसला, तरी पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे.
विद्यापीठाच्या एकूण कामकाजात सर्वाधिक कार्यभार हा परीक्षेच्या कामाचा आहे. त्यामध्येही अभियांत्रिकी शाखेसाठीच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी. या हजारो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणे, त्यानंतर निकाल जाहीर करणे या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यामुळे वेळेवर निकाल जाहीर न होण्याची ओरड अभिययांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असते. या पाश्र्वभूमीवर आता अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिकांची तपासणीही संगणक प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून (एमई) ही नवी पद्धत अमलात आणण्यात येणार आहे.
एमईच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन्स’, ‘इलेक्ट्रिकल’  या शाखांच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाधारित करण्यात येणार आहे. या उत्तरपत्रिका स्कॅन करून त्यानंतर त्याचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मूल्यमापनासाठी लागणारा वेळ फारसा कमी झाला नाही, तरी त्यानंतर मुनर्मूल्यांकनासाठी लागणारा वेळ मात्र वाचू शकणार आहे. उत्तरपत्रिका मुळातच प्रणालीवर उपलब्ध असल्यामुळे ती काढणे आणि त्याचे पुन्हा एकदा मूल्यांकन करणे यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या वर्षी या पद्धतीने साधारण १२ ते १५ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी २५ ते ३० संगणक, स्कॅनर अशी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

‘‘गेल्या सत्र परीक्षेसाठी काही विषयांसाठीच ही प्रणाली वापरण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यामुळे आता या सत्रात तीन शाखांतील उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर पूर्ण विद्याशाखेसाठी ही प्रणाली लागू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचे परिणाम नक्की काय होतात. ते आता लक्षात येऊ शकत नसले, तरी मूल्यमापनाचा वेळ नक्कीच कमी होऊ शकेल.’’
– डॉ. अशोक चव्हाण, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ