इंद्रायणी नदीच्या किनारी हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाय घसरून नदीच्या पुरात पडला, पण केवळ नशीब बलवत्तर असल्याने तो व्यक्ती वाचला. आळंदीमध्ये शनिवारी(दि.27) रात्री उशीरा ही घटना घडल्याचे समोर आले आहे. केवळ नशीब बलवत्तर असल्याने या व्यक्तीचा जीव वाचला मात्र तब्बल सात तास तो इंद्रायणी नदीच्या घाटावर पुराच्या पाण्यात समाधीला पकडून बसला होता. त्या व्यक्तीला आज(दि.28) सकाळी स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले आहे.

संजय गजानन कंडारकर (वय-50) असे इंद्रायणी नदीच्या पुरात अडकलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास संजय हे इंद्रायणी नदीत हात पाय धुण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांचा अचानक तोल गेला आणि थेट इंद्रायणी नदीच्या पुराच्या पाण्यात पडले. त्यांना काही कळायच्या आत पुराच्या पाण्यात काही अंतरावर ते वाहून गेले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी तीन वेळेस आसपासच्या विविध साहित्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ओलावा असल्याने त्यांचे हात निसटत होते, असे त्यांनी सांगितले. अखेर आळंदीच्या घाटावर एका समाधीला ते पकडून बसले होते. तब्बल सात तास ते जीवाच्या आकांताने समाधीला पकडून होते. रात्रभर त्यांनी स्थानिकांनाही आवाज दिला मात्र पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने आवाज ऐकू जात नव्हता.

अखेर आज(दि.28) सकाळी सहाच्या सुमारास अशोक टिंगरे या व्यक्तीने त्यांना पुराच्या पाण्यात अडकलेले पाहिले. त्यांनी तातडीने याबाबतची  माहिती आळंदी पोलिसांना दिली. अखेर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मानवी साखळी करून संजय यांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी त्यांचा चष्मा, हातातील छत्री आणि पायात असलेली चप्पल हे सर्व अगदी आहे तसे होते. जीव वाचल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीचे आभार मानले.