संजय लीला भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा वाद क्षमण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. आज पेशव्यांच्या वंशजांनी जाळपोळ करत या चित्रपटाला असलेला आपला विरोध व्यक्त केलाय.
बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावरून अद्यापही वाद सुरूच असून या चित्रपटाविरोधात शनिवार वाड्यावर पेशव्यांच्या वंशजांनी जोरदार निदर्शने केली. या चित्रपटात  इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असून तो प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेत चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे फोटोही जाळण्यात आले. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, पुष्कर पेशवे, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते.
या चित्रपटात भन्साळींनी इतिहासाचे विकृतीकरण आणि बिभत्स रूप दाखवल्याची टीका ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांनी केली. चित्रपटातील गाण्यांचा आणि त्यामध्ये मांडण्यात आलेल्या घटनांचा निषेध करीत हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालू देणार नाही असा इशाराही पेशव्यांचे वंशज आणि इतर संघटनांनी दिला.