राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवलेली वेगवेगळ्या जातीची कुत्री, मांजरे यांच्या विविध जाती ‘पेट कार्निव्हल’च्या निमित्ताने पाहता येणार आहेत. पुणे केनल कॉन्फेडरेशनच्या शंभरावा डॉग शोही या कार्निव्हलमध्ये होणार असून शुक्रवारपासून हे कार्निव्हल सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे केनल कॉन्फडरेशनचे अध्यक्ष कॅप्टन सनी जेकब यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुणे केनल कॉन्फडरेशनचे सचिव संजय देसाई, विश्वस्त आनंद किराड आदी उपस्थित होते. पेट कार्निव्हलमध्ये देशभरातील साधारण पाचशे कुत्री आणि पन्नास मांजरे सहभागी होणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या कुत्र्यांमधील जवळपास तिनशे कुत्री पुण्यातील आहेत. गेली अनेक वर्षे देशभरातील डॉग शोजमध्ये नावाजलेला पुणे केनल कॉन्फेडरेशनचा शंभरावा डॉग शोही या कार्निव्हलमध्ये होणार आहे. त्याचप्रमाणे जर्मन शेफर्ड, रॉटविलर आणि डॉबरमन पिंचर या जातींच्या कुत्र्यांचे स्पेशालिटी शोजही होणार आहेत. याशिवाय ‘ऑल ब्रीड डॉग शो चॅम्पियनशिप’चेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व प्रजातींमधील सवरेत्कृष्ट नर आणि मादी कुत्र्याला पारितोषिक देण्यात येणार आहे.
याशिवाय कार्निव्हलच्या कालावधीत शनिवारी आणि रविवारी ‘ओबिडियन्स अँड एजिलिटी’चे प्रात्यक्षिकही होणार आहे. म्हात्रे पुलाजवळील पंडित फार्म येथे हे कार्निव्हल होणार असून शुक्रवार (२० फेब्रुवारी) ते रविवार (२२ फेब्रुवारी) या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत हे कार्निव्हल रंगणार आहे.