अधिभार काढण्याची पेट्रोल डिलर असोसिएशनची मागणी

पुणे : देशभरातच सध्या पेट्रोलच्या दरात नवनवा उच्चांक होत असताना पुणे शहरात पेट्रोलचे दर ९१ रुपयांपर्यंत गेले आहेत. डिझेलच्या दराने ८० रुपयांचा टप्पा ओलांडला असून, पुण्यात डिझेलचा प्रतिलिटर दर ८०.०६ रुपये झाला आहे. इंधनावर यापूर्वी राज्य शासनाने लावलेला दोन रुपयांचा अधिभार काढून टाकावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

टाळेबंदीच्या काळात पेट्रोलचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरांमध्ये हळूहळू वाढ झाली. २० नोव्हेंबरला पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८७.६७ रुपये, तर डिझेलचे दर ७५.७१ रुपये होते. त्यात दोन ते तीन आठवडय़ांत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. शहरामध्ये सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेले होते. काही दिवस पेट्रोल ९१ ते ९३ रुपये लिटरने मिळत होते. इंधनाच्या या भडकलेल्या दराविरुद्ध अनेकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने केंद्र, राज्य शासनाने इंधनावरील करांमध्ये काही प्रमाणात कपात करून दर खाली आणले होते. २०१८ नंतर ७ डिसेंबर २०२० ला शहरात पुन्हा पेट्रोलचा दर नव्वदीपार गेला. काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर चार ते पाच दिवसांपासून त्यात पुन्हा वाढ सुरू झाली असून, या काळात एक रुपयांनी दरवाढ होऊन पेट्रोल ९१ रुपयांवर पोहोचले आहे.

ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबत सांगितले, की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे करोनाच्या काळात एप्रिलमध्ये राज्य शासनाकडून इंधन दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. कच्च्या तेलाच्या किमती कमी असलेल्या काळात एप्रिल ते जून या कालावधीत केंद्र शासनाने उत्पादन शुल्कात तीन वेळा वाढ केली. त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ होत आहे. केंद्राकडून नागरिकांना दिलासा देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. राज्य शासनाने यापूर्वी  इंधनावर लावलेला २ रुपयांचा दुष्काळ अधिभार मागे घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आम्ही नोंदविली आहे.

पुण्यातील इंधनाचे दर

दिनांक         पेट्रोल   डिझेल

२० नोव्हेंबर     ८७.६७  ७५.७१

३० नोव्हेंबर     ८८.६९  ७७.४७

४ डिसेंबर       ८९.१९  ७८.१५

७ डिसेंबर       ९०.००  ७८.९७

१४ जानेवारी     ९१.००  ८०.०६

(प्रतिलिटर दर रुपयांत)