पुण्यात पेट्रोलचा दर ८३.८७ रुपये लिटर

पुणे : राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवर १ जूनपासून प्रतिलिटर दोन रुपयांच्या मूल्यवर्धित कराची आकारणी सुरू केल्यानंतर दोन रुपयांनी महागलेल्या इंधनाचे दर त्यानंतरच्या कालावधीतही वाढतच राहिले. अवघ्या १५ ते १६ दिवसांमध्ये मूल्यवर्धित करासह पेट्रोलच्या दरांत तब्बल सात रुपयांनी वाढ झाली. डिझेलचे दरही त्याच तुलनेत वाढलेले आहेत. ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनने मात्र यापुढे हे दर स्थिर राहतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील कठोर टाळेबंदीच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. दरवाढ नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या आसपास होता.

करोनाची स्थिती आणि थांबलेले अर्थचक्र लक्षात घेऊन मेपासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये नव्या मूल्यवर्धित करासह १ जूनला पेट्रोल प्रतिलिटर ७८.०९ रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६६.९९ रुपयांवर गेला.

जूनच्या सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर परिणाम झाल्याने इंधनाचे दर दररोजच वाढत राहिले. जूनच्या पहिल्या आठवडय़ानंतर इंधनाची झपाटय़ाने दरवाढ झाली. ११ जूनला शहरात पेट्रोलच्या दरांनी ८० रुपयांचा आकडा ओलांडला. या दिवशी शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८०.७३ रुपये झाला. १२ जूनला डिझेलच्या दराने ७० रुपयांचा आकडा पार केला. डिझेलचे दर या दिवशी प्रतिलिटर ७०.१७ रुपयांवर पोहोचले. त्यानंतरही दररोजची दरवाढ सुरू राहिली. त्यामुळे १५ ते १६ दिवसांतच पेट्रोलसह डिझेलच्या दरामध्ये तब्बल सात रुपयांची वाढ झाली.

इंधन दरवाढीची गती

दिनांक पेट्रोल   डिझेल

१ जून  ७८.०९  ६६.९९

८ जून  ७९.२५  ६८.११

११ जून ८०.७३  ६९.६२

१३ जून ८१.८४  ७०.१७

१७ जून ८३.८७  ७२.९४

(प्रतिलिटर रुपये)

जूनपासून राज्य शासनाच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली. आता मात्र इंधनाचे दर मोठय़ा प्रमाणात वाढणार नसून, ते स्थिर होतील.

-अली दारुवाला, ऑल इंडिया पेट्रोल डिलस असोसिएशन प्रवक्ता