दोन आठवडय़ांत दोन रुपयांहून अधिकची दरवाढ

पुणे : देशभरातच सध्या पेट्रोलच्या दरात नवनवा उच्चांक होत असताना पुणे शहरात पेट्रोलचे दर पुन्हा नव्वद रुपयांवर गेले आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये शहरात पेट्रोलच्या दरांनी नव्वदी पार केली होती. पेट्रोलच्या दरवात गेल्या दोन आठवडय़ांमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. डिझेलच्या दरातही सध्या मोठी वाढ होत असून, पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर ९० रुपये, तर डिझेलचा दर ७८.९७ रुपयांवर पोहोचला आहे.

टाळेबंदीच्या काळात पेट्रोलचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरांमध्ये हळूहळू वाढ झाली. २० नोव्हेंबरला पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८७.६७ रुपये, तर डिझेलचे दर ७५.७१ रुपये होते. त्यात दोन ते तीन आठवडय़ांत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली. शहरामध्ये सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेले होते. काही दिवस पेट्रोल ९१ ते ९२ रुपये लिटरने मिळत होते.

इंधनाच्या या भडकलेल्या दराविरुद्ध अनेकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने केंद्र, राज्य शासनाने इंधनावरील करांमध्ये काही प्रमाणात कपात करून दर खाली आणले होते.

पुण्यातील इंधनाचे दर

दिनांक          पेट्रोल     डिझेल

२० नोव्हेंबर     ८७.६७  ७५.७१

२६ नोव्हेंबर     ८८.०७  ७६.६४

३० नोव्हेंबर     ८८.६९  ७७.४७

२ डिसेंबर       ८८.८३  ७७.७१

४ डिसेंबर       ८९.१९  ७८.१५

७ डिसेंबर       ९०.००  ७८.९७

(प्रतिलिटर दर रुपयांत)

पुण्यात सध्या पेट्रोलचा दर नव्वद रुपयांवर गेला आहे. पुढील तीन ते चार दिवस दरांतील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोलचा दर काही दिवस नव्वदच्या किंचित जवळपास राहू शकेल.

– अली दारुवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन.