कमी डिझेल भरल्याच्या वादातून मोटार चालकाला पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मोटार चालकाने थेट हवेत गोळीबार केल्याची घटना वाकड येथील बालवडकर पेट्रोलपंपावर घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून दोन्ही बाजूच्या व्यक्तींना अटक केली आहे. कमी पेट्रोल किंवा डिझेल भरल्यामुळे अलीकडे वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
हवेत गोळीबार केल्याच्या आरोपावरून मोटारीतील अब्दुल लतीफ रफिक उल्लाह खाँ (वय ३९, रा. साईपार्क, प्राधिकरण), नसीफ रौफ खाँ (वय २४) आणि सराफत शौकत अली (रा. दोघेही- विश्वास पार्क, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. तर, मोटारीतील व्यक्तींना मारहाण केल्याच्या आरोपावरून चंद्रकांत धोंडिबा गवळी (वय ३१), मनोज राजेंद्र काळे (वय ३८, रा. संतोषनगर, कात्रज), रामलिंग मुरलीधर फरकांडे (वय ३३, रा. कैलासनगर, थेरगाव), सूर्यकांत गुरूराज गुरफळे (वय ३५, रा. संतोषनगर, कात्रज), विजय शंकर चापुले (वय २२, रा. काळेवाडी) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील बालवडकर पेट्रोलपंपावर अब्दुल, नसीफ, अली हे डिझेल भरण्यासाठी आले होते. नसीफ याच्या ‘आय २०’ मोटारीत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी कमी डिझेल भरले. त्यावरून पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांसोबत मोटारीतील तिघांनी वाद घातला. वाद वाढल्यामुळे पेट्रोल पंपावरील इतर कर्मचारी गोळा झाले. त्यांनी या तिघांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे नसीफ व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. गोळीबार झाल्याची घटना समजताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  या घटनेनंतर दोन्ही बाजूकडून वाकड पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.