पॉवर ९९.३०, तर साधे पेट्रोल ९५.६३ रुपये लिटर

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतील वाढ थांबण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसून येत नाही. शहरांतर्गत वाहतुकीसाठी राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या पुणेकरांना पेट्रोल दरवाढीच्या भडक्याचा मोठा फटका बसतो आहे. शहरात पेट्रोलचा दर वेगाने १०० रुपये लिटरच्या दिशेने जात आहे. पॉवर पेट्रोल १०० रुपयांजवळ पोहोचले असून, १७ फेब्रुवारीला त्याचा दर ९९.३१ रुपये लिटर झाला होता. साधे पेट्रोल ९५.६५ रुपये लिटर असून, डिझेलचा दर ८५.३० रुपये लिटर झाला आहे.

भरमसाठ शासकीय कर-अधिभार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमतींमुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुणे शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक निर्माण करीत आहेत. पूर्वीचे आणि करोनाच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाकडूनही इंधनावर विविध कर लावण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ सुरू झाली. २० नोव्हेंबरला पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८७.६७ रुपये, तर डिझेलचे दर ७५.७१ रुपये होते. सप्टेंबर २०१८ मध्ये पेट्रोलचे दर नव्वदीच्या पार गेले होते. काही दिवस पेट्रोल ९१ ते ९३ रुपये लिटरने मिळत होते.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पेट्रोलच्या दराने पुन्हा ९० रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सातत्याने काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच राहिले. १४ जानेवारीला पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला. २३ जानेवारीला पेट्रोल ९१.९५ रुपये लिटर झाले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यात मोठी वाढ होऊन पुण्यात पेट्रोल ९३.१४ रुपये लिटरवर पोहोचले. पुण्यात यापूर्वी कधीच पेट्रोलचे दर ९३ रुपयांपुढे गेले नव्हते. त्यामुळे ५ फेब्रुवारीचा दर उच्चांकी ठरला. त्यानंतरही दरात सातत्याने वाढ सुरूच राहिल्याने दराचा रोज नवा उच्चांक होतो आहे. ११ फेब्रुवारीला शहरात पेट्रोल ९४ रुपये लिटर, तर डिझेल ८३.३१ रुपये लिटरवर पोहोचले. १५ फेब्रुवारीला पेट्रोलच्या दराने ९५ रुपये, तर १६ एप्रिलला डिझेलच्या दराने ८५ रुपयांचा टप्पा पार केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे पाच रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

केंद्र आणि राज्य शासनाने इंधनावरील कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.

पुण्यातील इंधन दरवाढ

(प्रतिलिटर दर रुपयांत)

दिनांक          पेट्रोल     डिझेल

२० नोव्हेंबर     ८७.६७   ७५.७१

३० नोव्हेंबर     ८८.६९   ७७.४७

४ डिसेंबर       ८९.१९   ७८.१५

७ डिसेंबर       ९०.००    ७८.९७

१४ जानेवारी    ९१.००  ८०.०६

२३ जानेवारी    ९१.९५  ८१.०९

५ फेब्रुवारी      ९३.१४  ८२.३८

११ फेब्रुवारी     ९४.००  ८३.३१

१७ फेब्रुवारी     ९५.६३  ८५.३०