29 September 2020

News Flash

पेट टॉक : समाजमाध्यमांवरील पेट्स सेलिब्रिटी

सध्याच्या गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये एक गोबरे मांजर व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने हजेरी लावते आहे.

सध्याच्या गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये एक गोबरे मांजर व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने हजेरी लावते आहे. आरतीच्या वेळी दोन पायांवर उभे राहून पुढील दोन पायांचा हातासारखा वापर करीत मांजर टाळ्या वाजवण्याचा हावभाव करीत असलेला व्हीडीओ गाजतोय. आरती करणाऱ्या या मांजराचा ठावठिकाणा माहिती नसला, तरीही अनेकांचा गणेशोत्सव हे मांजर साजरा करत आहे.

मोबाइल कॅमेरा आणि लोकप्रिय समाजमाध्यमांचा उदय एकाच काळामध्ये झाला. परिणामी जगभरामध्ये सुरुवातीला समाजमाध्यमांवर मोबाइलवर चित्रित करण्यात आलेल्या घरातील लहान बाळांच्या करामतींचा सुळसुळाट होता. आपलं बाळ रांगू लागल्यापासून ते त्याचे गमतीदार बोल जगजाहीर करण्याचा पालकांना खूप उत्साह असे. या बाललीलांनंतर आपल्या घरातील पेट्सच्या अतिमाणसाळलेल्या, त्याच्या वागण्याच्या विशिष्ट पद्धतींना कॅमेऱ्यात चित्रीकरणाची हौसच गेल्या काही वर्षांत व्हायरल झाली. असाच काही दिवसांपूर्वी जागतिक योगदिवसाच्या दरम्यान योगा करणाऱ्या श्वानाचा आणि एका घरातील ओंकार साधना करणाऱ्या मालकाबरोबर श्वानही तारस्वरात ‘ओम’ म्हणत असल्याचे चित्रीकरण व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसिद्ध झाले होते. यातून प्राणीपालकाला आपल्या पेट्सचा व्हीडीओ जगभर पोहोचल्याचे समाधान मिळते. पाहणाऱ्यालाही आनंद मिळतो तो व्हीडीओ तातडीने इतरांना पसरविण्याचा प्रकार त्याच्याकडून होतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-टय़ूब या आणि इतर समाजमाध्यमे श्वान-मांजर-घरातील पक्षी यांच्यातील मानवी वर्तनाची चुणूक दाखविणाऱ्या व्हीडीओजनी काही प्रमाणात काबीज केली आहेत. यातून या समाजमाध्यमांवर अनेक ‘श्वान सेलेब्रिटी’ आणि ‘मार्जार सेलेब्रेटीं’ चाही उदय झाला. गंमत म्हणूनही त्याकडे पाहता येते आणि त्या त्या पेट्सविषयी कुतूहलही तयार होते. पण समाजमाध्यमांवरील पेट्सच्या कौतुकाचा हा सोहळा नवउद्यमी जाहिरात यंत्रणेने हेरला आणि त्यातून एक छुपी बाजापेठच विकसित झाली आहे. पेटधारक आपल्या श्वान-मांजरांच्या लाडापोटी तयार करणाऱ्या व्हीडीओजला किती हिट्स किंवा दर्शक आहेत, याचा शोध घेऊन ही जाहिरात यंत्रणा आपले इप्सित साध्य करते.

हौशी मालकांचा सहभाग

मोबाइल कॅमेऱ्याच्या आगमनानंतर आपल्या पेट्सच्या गमती-जमती चित्रित करण्यास उद्युक्त झाले. आपल्या पेटचा व्हीडीओ टीव्हीवर कुणीतरी प्रक्षेपित करण्याऐवजी आपणच समाजमाध्यमांवर अपलोड करू शकतो, या जाणिवेनंतर हौशी पेटमालक आपल्या वैशिष्टय़पूर्ण श्वान-मांजर-पक्ष्याला सजवू लागला. व्हीडीओ एडिटिंगच्या सॉफ्टवेअरद्वारे मोबाइलमधील चित्रीकरण अधिक चांगले करून पसरवू लागला. साधारण २००५ मध्ये ‘पपी व्हर्सेस कॅट’ हा व्हीडीओ नेटकऱ्यांनी उचलून धरला आणि त्यानंतर अनेक नवे नवे विक्रम करणारे व्हीडीओज समाजमाध्यमांवर पसरू लागले. प्राण्यांच्या या व्हीडीओजची लोकप्रियता किती तर स्वत: व्हीडीओज तयार करून ते यूटय़ूबवर अपलोड करणाऱ्या दर्शकांपैकी ४५ टक्के दर्शकनिर्माते हे त्यांच्या पाळीव प्राण्यांचे व्हीडीओज अपलोड करतात. यूटय़ूबने ‘पेट्स अँड अ‍ॅनिमल्स’ असा स्वतंत्र भागही तयार केला आहे. प्राण्यांच्या या चित्रफिती हौशीने बघणाऱ्या दर्शकांमधील २३ टक्के दर्शक हे श्वानाच्या चित्रफितींच्या शोधात असतात, तर १६ टक्के दर्शक हे मांजरांच्या चित्रफिती शोधत असतात.

सेलेब्रिटी पेट्स

‘ग्रम्पी कॅट’ हा मांजराचा व्हीडीओ २०१५ मध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर होता. साधारण याच दरम्यान ‘लिल बब’चे व्हीडीओज प्रसिद्ध झाले. त्यातून ‘लिल बब शो’ तयार झाला. त्यात मांजरांबरोबरच गिनिपिग्ज आणि छोटय़ा प्राण्यांचेही अनेक व्हीडीओज प्रसिद्ध झाले. याशिवाय ‘मारू’ हा स्कॉटिश फोल्ड प्रजातीच्या मांजराचा व्हीडीओ, ‘कलोनिअल म्याव’ हा हिमालयीन पर्शियन मांजरांचा व्हीडीओ, ‘नाला कॅट’, अनाथ असलेले ‘ऑस्कर’ आणि त्याला घर मिळाल्यानंतर त्याला मिळालेले सहकारी क्लॉज, माईक, बेथनी या मांजरांच्या व्हीडीओजची मालिका यांनी समाजमाध्यमे गाजवली. गेली अनेक वर्षे या ‘पेट्स सेलेब्रिटीं’मध्ये मांजर आपला वरचष्मा ठेवून होते. आता मात्र गेल्या वर्षी मांजरांचे विक्रम मोडून नवे श्वान सेलेब्रिटी यूटय़ूबवर दाखल झाले आहेत. त्यामध्ये ‘बू’ या श्वानाच्या व्हीडीओने आता ‘ग्रम्पी कॅट’लाही मागे टाकले आहे. या ‘बू’चे अनेक अल्बम्स इन्स्टाग्रामही गाजवत आहेत. याशिवाय ‘सूझीज सीनिअर डॉग्स’, ‘टू लेग्ड पिट बुल’ या अपंग असलेल्या श्वानाचा व्हीडीओ, ‘लेन्टील’, ‘मॅडी ऑन थिंग्स’ हा कून हाऊंड जातीच्या श्वानाचा व्हीडीओही लोकप्रिय आहे.

फनी डॉग्ज-फनी कॅट्स असा शोध घेतल्यास शेकडो क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळू शकतील. अ‍ॅरोबिक्स करणाऱ्या व्यक्तींची नक्कल करणाऱ्या मकाऊ पोपटाची क्लिप लोकप्रिय आहे. मटिल्डा नावाच्या विचित्र आकाराच्या डोळ्यांमुळे ‘एलियन कॅट्’ असा किताब मिळालेल्या मांजरीची क्लिप लोकप्रिय आहे. फेक आणि खास एडिट केलेल्या व्हीडीओजचाही त्यात समावेश आहे. गिनेस बुकमध्ये नाव नोंदविल्या गेलेल्या झूस या सर्वात मोठय़ा कुत्र्याचा व्हीडीओ अनेक हीट्स असणारा आहे. प्राण्यांचे व्हीडीओ शोधाल तेवढे कमीच अशी परिस्थिती आहे.

टीव्ही मालिकांतून आरंभ

प्राण्यांचे गमतीदार खेळ, हावभाव, फजिती यांच्या छोटय़ा चित्रफिती (क्लिप्स) एकत्रित करण्याची  सुरुवात १९९९-२००० काळात ‘द प्लॅनेट फनिएस्ट अ‍ॅनिमल’ या अमेरिकी टीव्ही मालिकेने केली. ही मालिकेसाठीचा दृष्यखजिना दर्शकच पुरवत असत. निर्मात्यांकडे आठवडय़ाला हजारो क्लिप्स दाखल झाल्यानंतर त्यातील निवडक क्लिप्सचे एकत्रीकरण करून विविध वाहिन्यांवर त्याचे प्रक्षेपण होई. प्राणीपालक नसणाऱ्यांचेही प्राण्यांच्या या करामतींनी मनोरंजन होत असल्याचे हेरून ही मालिका प्राइम टाइममध्ये सुरू झाली. कमीत कमी गुंतवणुकीत अधिकाधिक जाहिरात नफा मिळविणाऱ्या या मालिकेचे ब्रिटिश रूपही तयार झाले. भारतीय टीव्हीवरही या मालिकेचे अमेरिकी रूपडे हिंदूी भाषेत डब करून दाखविण्यात येई. साधारण २००८ पर्यंत सुरू असलेल्या या मालिकेचे अनेक भाग आजही समाजमाध्यमांवर लोकप्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 1:43 am

Web Title: pets celebrity on social media
Next Stories
1 एसटी अपघातात ९ ठार
2 भाजपला विकास कामाचा विसर, पुणे पालिकेत मनसेकडून ढोल वाजवून निषेध
3 दुचाकीची चावी मागितली म्हणून मित्राची हत्या
Just Now!
X