News Flash

गजानन जहागीरदार यांचा छायाचित्र संग्रह ‘एनएफएआय’कडे

जहागीरदार यांनी १३० छायाचित्रांचा संग्रह मगदुम यांच्याकडे सोपवला आहे.

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते गजानन जहागीरदार यांच्या वैयक्तिक संग्रहातील छायाचित्रे अशोक जहागीरदार यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांच्याकडे सुपूर्द केली. उजवीकडे बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले जहागीरदार यांचे रेखाचित्र.

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशी चतुरस्र ओळख लाभलेल्या गजानन जहागीरदार यांच्या वैयक्तिक संग्रहातील दुर्मीळ छायाचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सोपवण्यात आली आहेत. जहागीरदार यांचे पुत्र अशोक यांनी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांच्याकडे सोमवारी हा ठेवा सुपूर्द केला.

जहागीरदार यांनी १३० छायाचित्रांचा संग्रह मगदुम यांच्याकडे सोपवला आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी चितारलेले १९५३ च्या ‘महात्मा’ चित्रपटातील जहागीरदार यांच्या व्यक्तिरेखेचे रेखाचित्र हा या ठेव्यातील विशेष महत्त्वाचा भाग आहे. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या आणि दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात जहागीरदार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. डेव्हिड अब्राहम आणि रेखा या सहकलाकारांबरोबर घेतलेली जहागीरदार यांची अनेक छायाचित्रे या संग्रहामध्ये आहेत. प्रभात स्टुडिओच्या एका चित्रपटामध्ये जहागीरदार हे लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार होते, मात्र तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, टिळक यांच्या व्यक्तिरेखेसाठी केलेल्या वेशभूषा आणि रंगभूषेतील जहागीरदार यांचे छायाचित्र या संग्रहामध्ये आहे. हे छायाचित्र एवढे हुबेहूब आहे, की अनेक ठिकाणी लोकमान्यांचे छायाचित्र म्हणून त्याचा वापर करण्यात आला आहे. जहागीरदार यांच्या ‘रामशास्त्री’ चित्रपटातील रामशास्त्री या व्यक्तिरेखेचे छायाचित्रही या संग्रहात समाविष्ट आहे.

प्रकाश मगदुम म्हणाले,की भारतीय चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराच्या छायाचित्रांचा संग्रह प्राप्त होणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. जहागीरदार हे १९६१-६२ च्या कालावधीत फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे पहिले संचालक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे हा संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे येणे ही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:01 am

Web Title: photo collection of gajanan jahagirdar to nfai abn 97
Next Stories
1 प्राध्यापक भरतीही सुरू करा!
2 पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दीड महिन्याच्या बाळाचे प्राण वाचले
3 पुण्यात दिवसभरात १९६ नवे करोना रुग्ण, पिंपरीत ९५ नवे रुग्ण
Just Now!
X