भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी पालिकेने भरगच्च उपक्रमांचे आयोजन केले आहे. १२५ विद्यार्थी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करणार असून १२५ व्यक्ती नेत्रदानाचा संकल्प करणार आहेत. प्रख्यात गायक अनुप जलोटा व वैशाली माडे यांच्या गीतांची मेजवानी हे जयंती महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे.
महापालिकेच्या वतीने ११ ते १५ एप्रिल दरम्यान महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (११ एप्रिल) सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित चित्रांचे प्रदर्शन, प्रबोधनपर गीते, ‘विद्रोही ढसाळ’ हे कविसंमेलन, ‘मर्दानी बाणा’, परिसंवाद, भीमशाहिरी जलसा, ऊर्मिला धनगर व उत्कर्ष िशदे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम, ‘निळी धम्म पहाट’ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपप्रसंगी ‘दीपस्तंभ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.