नव्या संचमान्यतेनुसार शाळांमध्ये शिकवण्यासाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक सहल काढण्यासाठी मात्र १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असा नवा फतवा पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे मुळातच शाळेत शिक्षकच नाहीत, तर सहलीसाठी कुठून आणायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान झालेल्या अपघातानंतर पुणे विभागीय शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने धोकादायक ठिकाणी शालेय सहली नेऊ नयेत, असे आदेश काढले होते. मात्र धोकादायक ठिकाणे म्हणजे काय, काळजी घ्यायची म्हणजे काय, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात आला. त्यामुळे आता या आदेशानुसार कार्यालयाने काय काळजी घ्यावी याबाबतचे तपशील जाहीर केले आहेत. त्यानुसार आता सहली नेण्यासाठी दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
संचमान्यतेच्या नव्या निकषांनुसार शाळेसाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर करण्यात येतो. एका शाळेत दोन तुकडय़ा म्हणजे ६० विद्यार्थी असतील तरी शिकवण्यासाठी २ शिक्षक असतात. मात्र, याच विद्यार्थ्यांना सहलीला न्यायचे असेल तर नव्या नियमानुसार शिक्षक मात्र सहा लागणार आहेत. त्यामुळे सहल काढण्यासाठी शाळांनी शिक्षक आणायचे कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर सहलीला विद्यार्थिनी असतील, तर एक महिला शिक्षक आणि एक महिला पालक प्रतिनिधीही असणे आवश्यक आहे.