जागतिक स्तरावरील स्पर्धेत ‘कोविडस्पाय’ या यंत्रणेला पारितोषिक

पुणे : जागतिक स्तरावर नुकत्याच झालेल्या बेटर हेल्थ हॅके थॉनमध्ये पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या (पीआयसीटी) संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेतील कोड फॉर कोविड १९ या जागतिक गटात नागरिकांच्या संरक्षणासाठी पीआयसीटीच्या संघाने सादर के लेल्या ‘कोविडस्पाय’ या यंत्रणेला पारितोषिक मिळाले.

करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर जागतिक स्तरावर उपयुक्त ठरू शकणाऱ्या उपाययोजनांसाठी एचसीएल टेक्नोलॉजीजने मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या परीक्षक मंडळात जॉन हॉपकिन्स, केम्ब्रिज विद्यापीठ अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांतील तज्ज्ञांचा समावेश होता. करोना संसर्गाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या समस्यांवरील उपाययोजना सादर करण्याचे आव्हान स्पर्धकांना देण्यात आले होते. जवळपास बारा आठवडे ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत पन्नासहून अधिक देशांतील २०० हून अधिक संघांचा सहभाग होता.

पीआयसीटीच्या संघाने करोना साथीच्या काळात कार्यालयीन कर्मचारी, सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या नागरिकांचे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संरक्षण करण्यासासाठी ‘कोविडस्पाय’ यंत्रणा तयार के ली. पीआयसीटीच्या संघात तन्मय जैन आणि क्रिशा भांबानी यांचा समावेश होता.

त्यांना डॉ. कविता सुलतानपुरे यांनी मार्गदर्शन केले. या संघाला उपविजेतेपदासह दहा हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले. ‘जागतिक पातळीवर उपविजेतेपद मिळणे फारच अभिमानास्पद आहे. या स्पर्धेचा अनुभव खूपच छान होता. अनेक तज्ज्ञांशी संवाद साधता आला, खूप काही शिकायला मिळाले,’ अशी भावना क्रिशा भांबानी, तन्मय जैन यांनी व्यक्त केली.

‘कोविडस्पाय’विषयी..

‘कोविडस्पाय’ या व्यवस्थापन प्रणालीद्वारे तापमानाची तपासणी,  मुखपट्टी तपासणी, सुरक्षित अंतर नियम उल्लंघन तपासणी के ली जाते. सुरक्षित अंतराचे नियम पाळले न जाणाऱ्या जागा ओळखणे, या उल्लंघनाच्या आधारावर एखादी खोली किं वा जागा विभाजित करणे यांचा समावेश आहे.