एकदा चित्रपट झाला की मी त्याचा विचारही करत नाही. मग चित्रपट आणि मी, आमच्यातले नाते संपते. माझे आयुष्य जगायला मी मोकळा होतो. जसे माझे आयुष्य आहे तसेच चित्रपटालाही स्वत:चे आयुष्य असते.. ही भावना आहे. गेल्या चार दशकांपासून आशयघन चित्रपटांची निर्मिती करणारे आणि वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यावरही त्याच उत्साहाने नव्या विषयांना तन्मयतेने भिडणारे ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची.
शबाना आझमी आणि अनंत नाग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अंकुर’ या पहिल्याच कलाकृतीने चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पाऊल टाकणारे श्याम बेनेगल यांना मानाचा मुजरा करण्यासाठी ‘बेनेगल अॅट वर्क’ महोत्सव ‘झी क्लासिक’ वाहिनीवर सुरू झाला आहे. त्या अंतर्गत पुण्यामध्ये आलेल्या बेनेगल यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. या महोत्सवांतर्गत बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेले ‘त्रिकाल’, ‘भूमिका’, ‘मंडी’ आणि ‘निशांत’ हे चित्रपट रसिकांना पाहता येतील.
तुमचे चित्रपट पुन्हा पाहताना आता तुमची काय भावना असते, या प्रश्नासंदर्भात बेनेगल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मला माझ्या चित्रपटांविषयी बोलायला आवडत नाही. माझ्या मनातील आशय या माध्यमातून सांगून झाला, की मी त्यापासून वेगळा होतो. त्या चित्रपटाचा विचारही करत नाही. पुढच्या विषयासंदर्भातील काम सुरू करतो. माणसाप्रमाणेच चित्रपटालाही स्वत:चे आयुष्य आहे असे मला वाटते. चित्रपटाला त्याचे आयुष्य जगू द्यावे. त्यामध्ये गुंतून राहू नये. त्यामध्ये गुरफटून राहिलो, तर चित्रपटाला अपयश आले तरी त्याचे दु:ख वाटत नाही. आपण चित्रपटाशी नाते संपवून टाकावे, असाच नवोदित चित्रपट निर्मात्यांना मी सल्ला देऊ इच्छितो.
चित्रपटासाठी पैसा लागतो. त्यामुळे गुंतवलेला पैसा परत मिळावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून चित्रपट करण्यामध्ये गैर काही नाही. पण, पैसे मिळविणे ही जबाबदारी पूर्णत्वास नेणे म्हणजे लोकांना हवे तेच देणे असेही नाही. तेच करायचे असेल तर त्यासाठी मी कशाला हवा. अशी रिकामी करमणूक करणारे अनेक जण आहेत. माझे वेगळेपण कसे सिद्ध होणार हा खरा प्रश्न आहे. मी स्वत:शी, कथानकाशी आणि सादरीकरणाविषयी मी प्रामाणिक असतो. यश संपादनासाठी तडजोड करत नाही, असेही त्यांनी सांगितले. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे चित्रपट हे माध्यम सर्वाच्याच हाती आले आहे. पण, तुम्ही कोणता आशय देणार हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संविधानाची कहाणी
भारतीय राज्य घटनेविषयीची ‘स्टोरी ऑफ इंडियन कॉन्स्टिटय़ूशन- संविधान’ ही दहा तासांची मालिका सध्या सुरू आहे, असे सांगून बेनेगल म्हणाले, मी सहा वर्षे संसदेमध्ये होतो. संसद सदस्यांसह सामान्य नागरिकांना संविधानाबद्दल माहिती नाही, असे मला जाणवले. उपराष्ट्रपती यांच्याशी झालेल्या चर्चेतून या मालिकेचे कथाबीज सापडले. केवळ तीन वर्षांत या देशाच्या घटनेची निर्मिती झाली आणि त्याची अंमलबजावणीही झाली. हा इतिहास उत्कंठावर्धक आहे. एक तासाच्या दहा भागांतून हा विषय रसिकांसमोर येत आहे. तीन वर्षांत घटनेची अंमलबजावणी करून भारतामध्ये लोकशाही नांदू शकली. याउलट पाकिस्तानला घटना निर्मितीसाठी २५ वर्षे लागली आणि तेथे लोकशाही अस्तित्वात आली नाही.