ज्या संगीताने विकार जातात अन् संस्कार उभे राहतात, लोकसंगीत व अभिजात संगीताला बरोबर घेऊन जाणारे ते प्रबोधनाचे संगीत म्हणजे वारकरी संगीत होय, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले.
चिंचवडच्या वारकरी संगीत संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. स्वागताध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, बापूसाहेब पठारे, काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी आमदार दिगंबर भेगडे, उपमहापौर राजू मिसाळ, पं. उद्धव आपेगावकर, पं. यादवराज फड, आत्माराम शास्त्री, माजी कुलगुरू एस. एन. पठाण आदी उपस्थित होते. या वेळी मंगला कांबळे, पांडुरंग दातार, सुधाकर चव्हाण, अरुण येवले, सुखलाल बुचडे, भाऊसाहेब आगळगे, हनुमंत गराडे, राजाराम बारणे, बाळकृष्ण कुलकर्णी, दत्तात्रय वाघमारे, मुकेश बादरयानी, शांताराम निम्हण, वंदना घांगुर्डे, सुप्रिया साठे, शिवानंद स्वामी, कन्हय्यालाल भूमकर, गोपाळ कुटे, खंडू िझझुर्डे, जालींदर आल्हाट, माउली गाडे, निकाजी शिवले, दामोदर विनोदे, आत्माराम नवले, शेखर कुटे, किसन चौधरी, रखमाजी काटे, सोपान वाल्हेकर, अंकुश रानवडे यांना ‘चंद्ररंग वैष्णव विचार’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
देखणे म्हणाले, रागाबरोबर अनुराग निर्माण करण्याची शक्ती वारकरी संगीतात आहे. वैश्विक वाद पळवून लावण्याचं बळ पखवाज वादनात आहे. भागवत धर्माच्या पताकांना जात-धर्म नसतो, असे पठाण म्हणाले. संमेलनातून चांगल्या विचारांची देवाण-घेवाण झाल्याचे भोईर म्हणाले.
राजाश्रय हवाच – पं. आपेगावकर
वारकरी संगीत मनोरंजन नसून ठेवा आहे, तो जपण्यासाठी राजाश्रय महत्त्वाचा असून त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, असे मत ज्येष्ठ मृदुंगाचार्य पं. उद्ववबापू आपेगावकर यांनी व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. वारकरी संगीत हे संस्कारक्षम संगीत असून त्याची व्याप्ती मोठी आहे. वारकऱ्यांचा पखवाज व शास्त्रीय पखवाजाची भाषा एकच आहे. सांप्रदायिक पद्धतीने पखवाज वाजवताना पारंपरिक पद्धत वापरली जाते, असे सांगत आपेगावकरांनी दोन्हीतील फरक सादर केला, त्यास उपस्थितांकडून दाद मिळाली.