News Flash

काँग्रेसला अनुकूल; तरीही राष्ट्रवादी, भाजपकडे ओढा

सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित महिला व सर्वसाधारण महिला या चारही गटात सध्या नाटय़मय घडामोडी सुरू आहेत.

काय चाललंय  प्रभागात

प्रभाग क्र. ९ खराळवाडी-नेहरूनगर-मासूळकर कॉलनी

झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ा असा साधारणपणे ५०-५० टक्के संमिश्र भाग असलेला खराळवाडी-नेहरूनगर-मासूळकर कॉलनी हा प्रभाग सकृतदर्शनी काँग्रेसला अनुकूल आहे. मात्र, तगडे उमेदवार व प्रमुख इच्छुकांनी तिकिटासाठी राष्ट्रवादी आणि भाजपकडे गर्दी केल्याचे विसंगत चित्र पुढे आले आहे. या ठिकाणी निवडणूक रिंगणात नऊ नगरसेवक येऊ शकतात. खराळवाडीतील कदम कुटुंबीय आणि नेहरूनगरच्या भोसले कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित महिला व सर्वसाधारण महिला या चारही गटात सध्या नाटय़मय घडामोडी सुरू आहेत. समीर मासूळकर, सविता साळुंके, मंदाकिनी ठाकरे, राहुल भोसले, शकुंतला बनसोडे, कैलास कदम, सद्गुरू कदम, अमिना पानसरे, गीता मंचरकर या नऊ नगरसेवकांसह माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, जगदीश तिमय्या शेट्टी निवडणूक रिंगणात येऊ शकतील. नेहरूनगर आणि खराळवाडीत काँग्रेसचे प्राबल्य आहे. नेहरूनगरमध्ये भोसले परिवाराचा, तर खराळवाडीत कदम बंधूंचा प्रभाव आहे. दोन्ही मिळून काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. हे दोन्ही भाग आता एकाच प्रभागात समाविष्ट झाल्याने काँग्रेसला अनुकूल प्रभाग तयार झाला आहे. मात्र, उमेदवारीसाठी इच्छुकांची राष्ट्रवादी आणि भाजपकडे गर्दी झाली आहे.

राहुल भोसले व कैलास कदम यांना राष्ट्रवादीची ‘ऑफर’ आहे. सद्गुरू कदम किंवा त्यांची पत्नी निर्मला कदम निवडणूक रिंगणात राहतील, असे दिसते. भोसले व कदम परिवाराचा अन्य पर्यायांवर विचार सुरू असून त्यांच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून आहे. समीर मासूळकर राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून निवडून आले. पाच वर्षे राष्ट्रवादीशी संलग्न राहिले. क्रीडा समितीचे सभापतीपद त्यांना मिळाले. नव्या प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी ते आग्रही आहेत. मात्र, हिरवा कंदील मिळत नसल्याने विविध पर्यायांचा विचार त्यांनी सुरू केला आहे. भाजपकडे खुल्या गटासाठी राजेश पिल्ले यांचे नाव आहे. पिल्ले यापूर्वी राष्ट्रवादीत होते. मात्र, आमदारकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पक्ष बदलला. गेल्या वेळी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने वैशाली घोडेकर यांनी बंडखोरी केली. अटीतटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला. आता त्या पुन्हा राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:13 am

Web Title: pimpari chinchwad corporation ward no %e0%a5%af detail
Next Stories
1 रांगांमध्ये नाराजीचा सूर
2 सुरक्षितपणे चालता यावे!
3 पादचारी सुरक्षा धोरण कागदावर, पादचारी वाऱ्यावर
Just Now!
X