सांगवीत महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धा होणार

पिंपरी पालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या दोन टप्प्यासाठी होणाऱ्या सुमारे ११२ कोटी रूपये खर्चास बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यस्तरीय महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धा सांगवीत घेण्याचा निर्णय घेत त्यासाठी होणाऱ्या खर्चासही समितीने मंजुरी दिली आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जवळपास १२१ कोटी ४९ लाख रूपयांच्या विकासकामांना मान्यता देण्यात आली. ‘अमृत’ अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २१७ कोटी रूपये खर्चास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या कामासाठी यापूर्वी एकच निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, या एकाच कामाच्या चार वेगवेगळ्या निविदा काढण्याचा पर्याय निवडण्यात आला. त्यातील पहिल्या तीन कामांसाठी १६६ कोटी ५६ लाख रूपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीपुढे होता. तथापि, त्यातील एक प्रस्ताव तहकूब ठेवून ११२ कोटी खर्चाच्या इतर दोन प्रस्तावांना स्थायीने मान्यता दिली.