करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टसिंग पाळण्यात यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करत आहेत. देशभरात याचं काटेकोरपणे पालन होतेय. मात्र काही ठिकाणी नेते आणि आधिकारी हा नियम मोडत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त, महापौर आणि सत्तारूढ काही नेत्यांना सोशल डिस्टसिंगचा विसर पडल्याचे दिसतेय. पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्यासह महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सोशल डिस्टसिंग हरताळ फासले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर करोना (कोवीड-१९) या वॉर रूमची पाहणी करण्यात आली. त्यावेळी आधिकारी आणि नेत्यांचा हा बेजबाबदारपणा समोर आला आहे. सर्वजण एकत्र जमल्यास गर्दी न करता दोन व्यक्तीमध्ये एक मीटर अंतर ठेवण महत्वाचं आहे. परंतु त्यांच्यात कोणतंही अंतर दिसत नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार सोशल डिस्टसिंगवर भर दिला असून त्या प्रमाणे नागरिकांनी वागावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर विविध ठिकाणी याची उपाययोजना करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात मुख्य ठिकाणी, बँक, तळेगाव येथील भाजी मंडईमध्ये सोशल डिस्टसिंग पाळण्यात आलं त्यांचं सर्वत्र कौतुक ही झालं आहे. दरम्यान, पिंपरी येथील बाजारात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. तेव्हा, महानगर पालिका प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केली. मात्र, स्वतः महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी सोशल डिस्टसिंग ला हरताळ फासल असून त्यांच्यावर काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.