आठ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरची तब्बल ४० लाखांना फसवणूक झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात उघड झाली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.अमित अनंत वाघ असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांनी निगडी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. या घटने प्रकरणी रोहन पवार नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित रुग्णालयात डॉ.अमित अनंत वाघ हे काम करतात. त्यांच्या मोबाईलवर रोहन पवार नावाच्या व्यक्तीने फोन करून मी स्टॅण्डर्ड चार्टड बँक कल्याणी नगर शाखा पुणे येथून बोलत आहे, असे सांगितले. डॉक्टरांसाठी आमची कर्ज योजना आहे. तुम्हाला पैशांची  गरज आहे का? अशी विचारणा त्याने डॉक्टरांकडे केली. यानंतर फिर्यादी डॉक्टर वाघ यांचा त्याने विश्वास संपादन करून सर्व केवायसी कागदपत्रे मिळवून आठ कोटी रुपयांचे तुम्हाला कर्ज काढून देतो असे सांगितले. एवढेच नाहीतर आठ कोटी व्याज मंजूर झाल्याचे बँकेचे बनावट मंजुरी पत्र  देखील तयार करून दिले व फिर्यादी डॉक्टराकडून  रोख ४० लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

दरम्यान, फिर्यादी  डॉक्टर वाघ यांना  त्यांच्या रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेले व्हेंटिलेटरसह इतर साहित्य घ्यायचे असल्याने त्यांना पैशाची आवश्यकता होती व यासाठी त्यांना कर्ज हवे होते, त्यातूनच त्यांची फसवणूक झाली. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांनी दिली आहे.