गणेशोत्सव असल्याने घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. परंतु, बाप्पांच्या अगमनाबरोबर आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख येथे घरगुती गणपती बाप्पांच्या पुढे दिवा लावण्यात आला होता. मात्र यानंतर आग लागल्याची घटना घडली असून यात तरुण आणि महिला जखमी झाली आहे. तर, फोर बीएचके फ्लॅट मधील दोन बेडरूम, एक हॉल, किचनमध्ये आग पसरल्याने काही साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने यात जीविहितहानी झालेली नाही. गोविंद मीलानी (वय- २०), राखी मीलानी (वय- ४५) अशी किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख परिसरात 24 के ओपुला नावाची सोसायटी असून सोसायटीच्या १६ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. फ्लॅटमधील साहित्य जळून खाक झाले आहे. मीलानी यांच्या कुटुंबात गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पांच्या पुढे दिवा लावला होता. मात्र यानंतर दिव्यामुळे आग लागली असल्याची माहिती गोविंद मिलानी यांनी अग्निशमन विभागाला दिली असल्याचे, अग्निशमन दलाने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, आग लागली तेव्हा गोविंद आणि राखी मीलानी या घटनेत जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजल आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, आग मोठी असल्याने फोर बीएचके मधील दोन बेडरूम, एक हॉल, किचनमध्ये आग पसरल्याने त्यामधील साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी राहटणी आणि मुख्य अग्निशमन केंद्र येथील तीन गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं गणेशोत्सवात दिवा लावत असताना काही घटना घडणार नाही ना याची दक्षता देखील घ्यायला हवी.