पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे घरगुती गॅसगळतीमुळे एका घराला भीषण आग लागली असून या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, कासारवाडीतील केशवनगरमधील गुरुनाथ कॉलनीत ही दुर्घटना घडली आहे. येथील बिरादार कुटुंबाच्या घराला ही आग लागली. सकाळी घरातील मंडळी झोपेत असताना ही दुर्घटना घडल्याने कोणाला तत्काळ बाहेर पडणे शक्य झाले नाही. शोभा बिरादार (वय ३०), गणेश बिरादार (वय ८), शुभम बिरादार (वय ५), देवांश बिरादार (वय ३), विजय जाधव (वय २२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातही थंडीचा कडाका जाणवत असल्याने बिरादार कुटुंबिय रात्री घराच्या दारं-खिडक्या लावून झोपी गेले होते. दरम्यान, रात्रीतूनच त्यांच्या घरात घरगुती सिलेंडरमधून गळती सुरु झाली. मात्र, घरातील सर्वजण झोपेत असल्याने कुणाच्या ही बाब लक्षात आली नाही. त्यानंतर सकाळी घरात स्फोट झाला. या स्फोटानंतर घराला भीषण आग लागली, या आगीत चार्जिंगला लावलेला मोबाईल आणि घरातील इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे बिरादार कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.