सात लाख लुटल्या गेलाचा बनाव रचणाऱ्या विश्वासू ड्रायव्हरला आणि त्याच्या इतर तीन मित्रांना दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पिस्तूलासह साडेचार लाखांची रोकड हस्तगत केली आहे. १ सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अभिषेक शिरसाट हा कामगारांची सात लाखांची रक्कम घेऊन निघाला होता. तेव्हा, त्याच्यासह असणाऱ्या साथीदाराला लुटल्याची घटना घडली होती. मात्र, पोलीस तपासात तो बनाव असल्याचं उघडकीस आल आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी ड्रायव्हर अभिषेक शिरसाट, यश आगवणे, कासीम मौला मुरशीद, सागर पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, इतर दोघेजण फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी साई स्टील ट्रेडर्स चे मालक भीमसेन वर्दीसिंग राजपूत यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजमजा करण्यासाठी सात लाख रुपये लुटल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता फिर्यादी यांचा विश्वासू ड्रायव्हर आरोपी अभिषेक शिरसाठ हा कामगारांचे पेमेंट घेऊन जात असताना, त्याचा अज्ञात पाच जणांनी पाठलाग करून व त्याला मारहाण करत त्याच्याजवळील सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती.

मात्र सुरूवातीला खराखुरा वाटणारा हा दरोडा नाट्यम घडामोडीनंतर बनाव असल्याचं उघड झालं. दरम्यान, दरोडा विरोधी पथक तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेत होते. तेव्हाच, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे आणि पोलीस उपनिरीक्षक भांगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील यश, कासीम आणि सागर हे आरोपी चिखली परिसरात लपले असून ते पळून जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड आणि पिस्तुल हस्तगत करण्यात आले.

पोलिसांच्या चौकशीत फिर्यादी यांचा ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ हा मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांना त्याच्यावर संशय असल्याने त्याच्यावर पोलिसांची बारीक नजर होती. मुख्य आरोपी शिरसाठ आणि इतर तिघेही एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यावर कर्ज होते. तसेच उरलेल्या पैशांमध्ये मौज मजा करणार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर, शिरसाठ याला लुटलेल्या पैशांमधून चार लाख मिळणार होते. तसं त्यांचं ठरलं देखील होतं. परंतु, त्यागोदरच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.