पिंपरी चिंचवडमधील पुनावळेमध्ये हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुनावळेमध्ये पूनाराम देवासी (वय ३७ वर्ष) यांचे किराणामालाचे दुकान आहे. गुरुवारी संध्याकाळी पूनाराम आणि त्यांचा भाचा विकास देवासी (वय २०) हे दोघे दुकानात होते. यादरम्यान तीन जण हातात तलवार घेऊन दुकानात आले. त्यांनी देवासी यांच्याकडे हप्ता मागितला. पण देवासी यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी देवासी आणि त्यांच्या भाच्यावर वार केले. यात पूनाराम देवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचा भाचा विकास हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.