पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (सोमवार) अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने देखील उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत भाजपाची एक हाती सत्ता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ संपल्यामुळे येत्या शुक्रवारी महापौरपदाबरोबच उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका माई ढोरे तर उपमहापौर पदासाठी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद खुला गट (महिला) यांना सुटले आहे. त्यामुळे भाजपाकडून महपौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना आतुरता होती. अखेर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या नगरसेविका माई ढोरे यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, उपमहापौर पदी तुषार हिंगे यांचं नाव चर्चेत नसताना उपमहापौर पदी लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत.