News Flash

शहरबात पिंपरी : भाजपविरोधात सर्वपक्षीयांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास १५ वर्षे शहराचा कारभार होता.

फुगेवाडी येथील विद्यालयाच्या सुशोभित इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते, तर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी महापालिकेतील पूर्वीचे सत्ताधारी आणि सध्याचे कारभारी यांच्यात सुरू असलेल्या श्रेयवादामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर संघर्ष निर्माण झाला आहे. आधीच्या तयार कामांची उद्घाटने होत असताना त्याचे श्रेय एकटा भारतीय जनता पक्ष घेत असल्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपने उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला, की त्याच्या आदल्याच दिवशी उद्घाटन करण्याचा सपाटा राष्ट्रवादीने लावला आहे. शहरात प्रचंड ताकद वाढलेल्या भाजपच्या विरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन हल्लाबोल सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या विरोधात शहर भाजपने सध्या मोहीम उघडली आहे.

सांगवी चौकात पिंपरी पालिकेने आकर्षक असा उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार केला, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशीच त्याचे उद्घाटन करून टाकले. दुसऱ्या प्रकरणात, नवी सांगवी येथील निळूभाऊ फुले रंगमंदिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भोसरीतील एकत्रित कार्यक्रमात होणार होते, मात्र राष्ट्रवादीने त्याचेही उद्घाटन आधीच करून घेतले. त्याच पद्धतीने, फुगेवाडीतील शाळा इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते, मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही आणि गुप्तपणे उद्घाटनाचा कार्यक्रम घेत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन करून त्याचेही परस्पर उद्घाटन करून टाकले. शाळेची ही इमारत दापोडी-फुगेवाडी प्रभागात असून या ठिकाणी माई काटे, रोहित काटे आणि राजू बनसोडे हे राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, त्यांना कसलीही माहिती न देता अतिशय गोपनीयता पाळून उद्घाटनाची तयारी सुरू होती. राष्ट्रवादीने केलेल्या कामांचे आयते श्रेय घेण्यासाठीच भाजपकडून ही राजकीय खेळी केल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केल्याचा युक्तिवाद राष्ट्रवादीकडून करण्यात येतो. तर राष्ट्रवादीकडून विकासकामांमध्ये राजकारण होत असून, ते पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आले नसल्याचा प्रतिवाद भाजपकडून करण्यात येतो.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास १५ वर्षे शहराचा कारभार होता. शहरभरात सध्या दिसत असलेला विकास हा राष्ट्रवादीच्या काळात झालेला आहे, हे कोणीही अमान्य करणार नाही. नऊ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले आणि भाजपकडे उद्योगनगरीचा कारभार आला. आधीच्या काळातील तयार कामांची उद्घाटने आणि मंजूर कामांचे भूमिपूजन सध्या होत आहे. भाजपकडून मोठा गाजावाजा करत हे समारंभ घडवून आणले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादीला अंधारात ठेवून हे कार्यक्रम होत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात आलेला १०७ मीटर उंचीचा झेंडादेखील यापूर्वीच मंजूर झाला आहे व त्याचा कार्यक्रम २६ जानेवारीला होणार आहे. अशा प्रकारची यादी बरीच मोठी आहे. ज्यात भाजपला शहरातील विकासाचे श्रेय घ्यायचे आहे आणि राष्ट्रवादीला ते श्रेय सोडायचे नाही. त्यांच्यातील या श्रेयवादातून हा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडील स्थानिक नेत्यांची कार्यपद्धती पाहता हा संघर्ष इतक्यात थांबेल, असे वाटत नाही.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारच्या विरोधात राज्यभरात हल्लाबोल आंदोलन सुरू केले असले तरी िपपरी-चिंचवड शहरातील त्यांच्या पक्षातील इतर नेते व प्रमुख कार्यकर्ते जरा उशिरानेच या कामाला लागले आहेत. कारण, राष्ट्रवादीचा एक गट भाजपशी संधान बांधून आहे व त्यांचे वेळोवेळी तोडपाणी सुरू असते, हे उघड गुपित असल्याचे बोलले जात आहे. दुसरा गट जमेल तसे आणि झेपेल इतकीच विरोधाची औपचारिकता पूर्ण करतो. शहरात सध्या भाजपच्या विरोधात सर्वपक्षीयांकडून रान पेटवण्याचे काम सुरू आहे व त्याची सुरुवात माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या माध्यमातून झाली. िपपरी पालिकेतील विशेषत: स्थायी समितीच्या कारभाराचा पंचनामा करण्याची मोहीम त्यांनी उघडली. त्यातच शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे दोन्ही खासदार व तत्कालीन शहरप्रमुख राहुल कलाटे यांनीही भाजप विरोधात तोफ डागली. आता राष्ट्रवादीने भाजप विरोधी आंदोलनाला धार आणली आहे. शहर पातळीवर शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून तर महापालिकेत विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी भाजप विरोधात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या मुद्दय़ावरून राजेंद्र जगताप यांनी भाजपवर आरोपांच्या फैरी डागल्या आहेत. इतर पक्ष व छोटय़ा मोठय़ा संस्थांनी तोच सूर आळवला आहे.

तुकाराम मुंढे नको रे बाबा!

पिंपरी भाजप आणि पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या मुंढे यांच्या विरोधात िपपरी भाजप नेत्यांनीच आता मोहीम उघडली आहे. पूर्वी पीसीएमटीचे जे कर्मचारी पीएमपीमध्ये समाविष्ट झाले आहेत, त्यांच्याकडून मुंढे यांच्याविषयी होणाऱ्या तक्रारींचा संदर्भ देत भाजप नेत्यांनी त्या कर्मचाऱ्यांचा कैवार घेतला आहे. मुंढे यांना शासनाच्या सेवेत बोलावून घ्यावे, अशी विनंती भाजप नगरसेवकांच्या वतीने पक्षनेते एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनीही मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. तथापि, महापौर नितीन काळजे यांनी थेट विरोधातील भूमिका घेतलेली नाही. मात्र, मुंढे नकोच, या विषयावर भाजपचे एकमत झाल्याचे दिसते. भाजपच्या नेतृत्वाचा हिरवा कंदील असल्याशिवाय मुंढे विरोधातील वातावरण इतके तापवले जाणार नाही. मुंढे यांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव चर्चेला यायचे, तेव्हा ‘मुंढे नको रे बाबा’ म्हणत भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला होता. याच मुंढे यांना पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावर बसवण्यात आले.

प्रत्यक्षात मुंढे यांनी तो पदभार स्वीकारलाच नाही.

बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 4:52 am

Web Title: pimpri chinchwad bjp opened campaign against tukaram mundhe
Next Stories
1 समाजमाध्यमातलं भान : ‘व्हॉट्सअ‍ॅप’मुळे शाळा ‘डिजिटल’
2 पुणे रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड
3 शहरात वाहने लावण्याची समस्या जीवघेणी
Just Now!
X