देशभरासह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले होते. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरात मागील १५ दिवसांमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तब्बल ७७८ जणांवर कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजपासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची ड्रोनच्या माध्यमातूनही नजर असणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह राज्यात करोना विषाणू ने थैमान घातले आहे. यामुळे १४४ कलम लागू करण्यात आले. मात्र, यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे अद्यापही विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या आहेच. 15 ते 30 मार्च या कालावधीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या तब्बल ७७८ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. यात सर्वाधिक तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या परिसरात ७९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना विषाणूला हरवायचं असेल तर सर्वांनी घराबाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.

कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत किती गुन्हे दाखल –
पिंपरी-४३, चिंचवड-३४, भोसरी-५०, भोसरी एमआयडीसी-७१, निगडी-४०, दिघी-३७, चाकण-०४, आळंदी-२८, वाकड-७०, हिंजवडी-७५, सांगवी-७५, देहूरोड-७०, तळेगाव दाभाडे-७९, तळेगाव एमआयडीसी-०६, चिखली-४१, शिरगाव चौकी-१४, म्हाळुंगे चौकी-२८, रावेत चौकी-१३ ऐकून- ७७८