पिंपरी-चिंचवडमध्ये करोना संकट काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आया यांनी रुग्णांची सेवा करून आपलं कर्तव्य बजावलं. मात्र, त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीत विविध मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागलं आहे. करोना महामारीत कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने कामावर रुजू केलं होतं.

पाचशे पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटर, रुग्णालये याठिकाणी कोविड रुग्णांची सेवा करून आपलं कर्तव्य बजावलं. परंतु, करोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याच पाहून महानगर पालिकेने पाचशे पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. याप्रकरणी करोना योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महानगर पालिकेच्या इमारतीसमोरच कंत्राट पुन्हा कायम करावं, या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं असून कडाक्याच्या थंडीत त्या दिवस रात्र उपोषण करत आहेत.

विशेष म्हणजे काही महिला, तरुणीचे कुटुंब देखील त्या ठिकाणी बसून असून त्यांची मुलींना साथ देत आहेत. एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही कठोर पाऊल उचलावी लागतील असा इशारा दिला आहे. त्यामुळे कोविड रुग्णवाढ झाल्यास काही दिवसांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासू शकते हे नाकारता येत नाही. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून करोना योद्धे बेमुदत उपोषणाला बसल्याचे पाहून अनेक स्थानिक राजकीय व्यक्ती त्यांना भेटून पाठिंबा असल्याचं दर्शवित आहेत आणि यातूनच ते राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत.