दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागासह प्रमुख महानगरांमध्ये करोनाचा प्रचंड उद्रेक झाला होता. या उद्रेकामुळे मुंबई, नागपूरसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मुंबई, पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतही करोना नियंत्रणात येऊ लागला आहे. गेल्या चार दिवसातील आकडेवारी दिलासादायक असून, रुग्णवाढीचा आलेख खाली घसरून लागला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीवर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला अंकुश घालण्यात यश असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या जास्त आहे. चार दिवसांमध्ये तब्बल १० हजार ६६३ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, ६ हजार ९०७ जण बाधित रुग्ण आढळले आहेत. शिवाय ४ लाख ६० हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर पिंपरी-चिंचवड शहरात दररोज अडीच हजारांच्या जवळ रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून चित्र उलट आणि दिलासादायक झालं आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास करोना आटोक्यात येईल अस म्हणावं लागेल. यावर ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवायला हवे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. यामुळे करोनाला आपण हरवू शकतो. दरम्यान, काही ठिकाणी करोनाच्या लाट ओसरली आणि ती पुन्हा आली हे विसरता कामा नये. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं,’ अस आयुक्त म्हणाले.

गेल्या चार दिवसांतील आकडेवारी

बाधित – १५४७, करोनामुक्त १९९९

बाधित -१३२७, करोनामुक्त २०५७

बाधित – ११०९, करोनामुक्त १७५८

बाधित – १७९०, करोनामुक्त २८८४