पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दिवसभरात १८ करोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ३ शहराबाहेरील करोना बाधितांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांनी पाचशेचा आकडा ओलांडला असून एकूण संख्या ५११ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २४९ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.

गेल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वारंवार होणाऱ्या वाढीमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शनिवारी नव्याने आढळलेले बाधित रुग्ण हे बौध्दनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर, दापोडी, चिंचोली, परंदवाडी, पाईट या परिसरातील रहिवासी असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बोध्दनगर, रुपीनगर व वाकड येथील रहिवासी असलेले कोविड-१९ बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.