पायी चालणाऱ्या महिलांचा दुचाकीवरुन येऊन विनयभंग करणाऱ्या एका विकृत तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्याने अनेक महिलांचा अशा प्रकारे विनयभंग केला आहे. मात्र, या तरुणाविरोधात एकही पीडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हती. दरम्यान, एका पीडित महिलेने धैर्य करुन यासंदर्भात वाकड पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल विकास भेगडे (वय २८, रा. पिंपळे निलख) असे या विकृत आरोपी तरुणाचे नाव असून तो उच्चभ्रू कुटुंबातील आहे. आरोपी तरुणाची पत्नी शिक्षिका असल्याचं देखील समोर आलं आहे. त्याचबरोबर तो अमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता, असेही त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले आहे.

वाकड परिसरात रात्री पतीसोबत शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ३१ वर्षीय महिलेला अशाच घटनेला सामोरे जावे लागले होते. विकृत आरोपी हर्षल त्याच्या दुचाकीवरून आला आणि या महिलेचा विनयभंग करुन पुढे निघून गेला. दरम्यान, आरोपी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवरील पहिला आणि शेवटचा आकडा दिसू नये म्हणून चिकट टेप लावत असल्याने त्याला शोधणे कठीण जात होते असे पोलिसांनी सांगितले. मात्र, आता तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे त्याला जेरबंद करण्यात आले आहे. असा प्रकार त्याने अनेक महिलांसोबत केल्याची कबुलीही दिली आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, याप्रकरणी ज्या महिलांबाबत असा प्रकार घडला असेल त्या महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.