पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दुर्लक्ष;  हस्तांतराच्या वर्षभरानंतरही मैदाने बंद

पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाने कोटय़वधी रुपये खर्च करुन विविध खेळांसाठी मैदाने विकसित केली आहेत आणि ही मैदाने महापालिकेकडे हस्तांतर करुन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र ही मैदाने खेळाडूंसाठी अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत. वापराअभावी या मैदानांची दुरवस्था होत असल्याचेही दिसत आहे.

पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक ४ मध्ये दोन टेनिस कोर्ट, व्हॉलिबॉलसाठी मैदान, धावपट्टी, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा आदी विकसित केले आहे. ६ हजार ८०३ चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या मैदानासाठी प्राधिकरणाने दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच पेठ क्रमांक ९ मध्ये स्पाईन रस्त्यालगत बॉस्केटबॉलचे मैदान विकसित करण्यात आले आहे. मैदानाचे क्षेत्रफळ ७ हजार ६६८ चौरस मीटर आहे. या ठिकाणी क्लब हाऊस तसेच अन्य अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहनतळ, स्वच्छतागृह विकसित करण्यात आले आहे. पेठ क्रमांक १० खंडेवस्ती, भोसरी जवळ हॉकीचे मैदान तयार करण्यात आले आहे. या ठिकाणीही क्लब हाऊस तसेच इतर सुविधांचा विकास प्राधिकरणाने केला आहे. पेठ क्रमांक १९ मध्येही क्रीडा मैदान तयार करण्यात आले आहे.

प्राधिकरणाने विकसित केलेली ही सर्व मैदाने मार्च २०१७ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही मैदाने खेळाडूंसाठी खुली करण्यात आलेली नाहीत. मैदानांमध्ये सुसज्ज असे क्लब हाऊस तयार करण्यात आले आहे. या क्लब हाऊससाठी आणि मैदानासाठी वीज जोडणी करण्यात आलेली नाही. तसेच नळजोड देखील महापालिकेने दिलेला नाही. महापालिकेने गेल्या वर्षभरापासून सुरक्षारक्षकही नेमला नव्हता. सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया आता सुरु करण्यात आली आहे. मात्र, या मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानांमध्ये गवत वाढत आहे. तसेच काही स्थानिक नागरिकांकडून मैदानामध्ये सायंकाळच्या वेळी मद्याच्या पाटर्य़ा केल्या जातात. गवत जाळण्याचे प्रकार केले जातात. कोटय़वधी रुपये खर्च करुन विकसित केलेल्या मैदानाची दुरवस्था होत असल्याने खेळाडूंमध्ये नाराजी आहे.