पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव जास्त आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याच रुग्णालयातील पदवीधारक आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी सोमवारी वेतनवाढीसाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले.

महानगरपालिकेच्या रुग्णलयात पदवीधारक आणि पदव्युत्तर असे ४० ते ४५ डॉक्टर काम करीत आहेत. करोनाच्या संकटात पण खांद्याला खांदा लावून हे सर्व आपलं कर्तव्य बजावत आहेत. या डॉक्टरांच्या वेतनवाढीबाबत राज्य शासनाने आदेश देऊनही पिंपरी-चिंचवड महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप वैद्यकीय अधिकारी यशवंत इंगळे यांनी केला आहे.

याच मागणीसाठी आज यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टर, अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काळ्या फिती लावत आंदोलन केले. यावेळी त्यांनी वेतनवाढ व्हावी यासाठी घोषणाबाजीही केली. तसेच वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉ. इंगले यांनी केला आहे.

करोनाच्या संकटात कर्तव्य बजावत असून कामावर परिणाम होऊ न देता काळ्या फिती लावून आम्ही काम करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.