गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी दिली नाही. गुन्हेगार म्हणून ज्यांच्याबद्दल ओरड होते ते काल कुठे होते? त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते. तुम्हाला सोडले की ते गुन्हेगार हा न्याय अजबच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचा हा राजकीय स्टंट असून आम्हाला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. ही ‘दादा’गिरीविरुद्धची लढाई आहे, अशा शब्दांत पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने रिपब्लिकन पक्षासोबत युती केली आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही वर्चस्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार आहे. भाजपने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्प समूह उद्यानात भाजप उमेदवारांना सुराज्याची शपथ दिली. यावेळी भाजपचे नेते आणि पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह भाजप, रिपब्लिकन पक्ष युतीचे उमेदवार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या सर्व उमेदवारांना गिरीश बापट यांनी शपथ दिली. यापुढे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शक, सुशासनयुक्त, विकासाभिमूख, गतीमान, भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आम्ही निश्चय करत आहोत. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य आमच्या हातून घडणार नाही, अशी शपथ भाजपच्या उमेदवारांनी घेतली. भेदभाव न करता सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवड शहराला देशातील आदर्श महापालिका बनवण्याचे वचनही भाजपच्या उमेदवारांकडून देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. गुन्हेगारांना आम्ही तिकीटे दिली नाहीत, असा दावाही बापट यांनी केला. गुन्हेगार म्हणून ज्यांच्याबद्दल ओरड केली जात आहे ते काल कुठे होते? त्यांच्या खांद्याला खांदा लावून होते. तुम्हाला सोडले की ते गुन्हेगार हा न्याय अजबच आहे. राष्ट्रवादीचा हा राजकीय स्टंट असून, आम्हाला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे, असा आरोप बापट यांनी केला. तसेच ही ‘दादागिरी’विरुद्धची लढाई आहे, असे सांगून सर्व कार्यकर्त्यांनी एकीने लढा आणि जिंका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.